प्रवासी वाढविण्यासाठी रेल्वेच्या हालचाली
पुणे – पुणे-मुंबई मार्गावर धावणारी डेक्कन क्वीनची डायनिंग कार काढण्यात येणार असल्याची शक्यता सूत्रांकडून वर्तविण्यात आली आहे.
पुणे-मुंबई रेल्वे मार्गावरील वाढत्या प्रवासी संख्येचा फटका डेक्कन क्वीनच्या डायनिंग कारला बसणार आहे. प्रवासी वाढविण्याकरिता डायनिंग कारच्या जागेवर प्रवासी डबा जोडण्याचा विचार रेल्वे प्रशासनाकडून करण्यात येत असल्याचे सूत्रांनी सांगितले.
गेल्या 89 वर्षांपासून डेक्कन क्वीन आणि डेक्कन क्वीनमधील डायनिंग कार प्रवाशांना सेवा देत आहेत. डेक्कन क्वीन ही देशातील पहिली “आयएसओ’ मानांकन मिळालेली रेल्वे गाडी आहे. डेक्कन क्वीनला सद्यःस्थितीत 17 डबे असून दररोज सुमारे अडीच हजार प्रवासी प्रवास करतात. तर डायनिंग कारची क्षमता 32 प्रवासी बसण्याची आहे. डायनिंग कार काढून त्या जागी प्रवासी डबा जोडल्यास 105 प्रवासी बसू शकतात.
वाढत्या प्रवासी संख्येचे कारण पुढे करून डायनिंग कार काढून टाकण्याचा प्रयत्न रेल्वे प्रशासनाकडून करण्यात येत आहे. यापूर्वी देखील रेल्वे कडून असा प्रयत्न करण्यात आला आहे. डेक्कन क्वीन यंदा 90 वर्षात पदार्पण करणार आहे. परंतु दरवर्षी 1 जूनच्या दरम्यान डेक्कन क्वीनबाबत रेल्वे प्रशासन काही ना काही कुरघोडी करते, असा आरोप प्रवासी संघटनांच्या वतीने करण्यात आला आहे. रेल्वे प्रशासनाने 17 कोचची डेक्कन क्वीन 24 कोचची करावी, अशी मागणी प्रवासी संघटनांच्या वतीने करण्यात येत आहे.