लोणावळा -पुणे-मुंबई डेक्कन क्वीन एक्सप्रेसमध्ये वर्षानुवर्षे लोणावळा पास धारकांसाठी सुरू असलेली बोगी बंद करण्यात आली आहे. त्यामुळे या गाडीने दैनंदिन प्रवास करणाऱ्या पासधारक प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे डेक्कन क्वीन एक्सप्रेस मधील पास धारकांसाठीची बोगी पूर्ववत सुरू करावी अशी मागणी लोणावळा मुंबई रेल्वे प्रवासी संघाने रेल्वे विभागाकडे केली आहे.
रोज सकाळी पुण्याहून सुटून मुंबईकडे जाणाऱ्या डेक्कन क्वीन एक्सप्रेसमध्ये लोणावळ्यात या गाडीत बसणाऱ्या प्रवाशांसाठी डी-10 ही एक खास बोगी पास धारकांसाठी आरक्षित ठेवलेली असायची. पिंपरी, चिंचवड ते लोणावळा दरम्यान राहणारे आणि दैनंदिन मुंबई प्रवास करणारे सुमारे 100 ते 150 प्रवासी या सुविधेचा लाभ घ्यायचे. ही बोगी असल्याने पिंपरी-चिंचवडसह मावळ तालुक्यातील प्रवाशांना मोठा दिलासा असायचा. मात्र 22 मार्च पासून रेल्वे विभागाने ही सुविधा बंद केल्याने या सर्वच प्रवाशांचे हाल होऊ लागले आहेत.
दरम्यान, रेल्वे प्रवासी संघटना , पिंपरी-चिंचवडचे अध्यक्ष इक्बाल मुलानी यांनी पुणे येथे रेल्वे प्रशासन अधिकाऱ्यांची याविषयावर भेट घेतली. याभेटीदरम्यान प्रवाशांच्या विविध समस्यांवर चर्चा करण्यात आली. कोविडचे निर्बंध हटविल्यानंतरही अनेक विभागांमधील रेल्वे सेवा सुरळीत झालेली नाही. असे असतानादेखील पुणे-मुंबई मार्गावरील अन्य एक्सप्रेस सुरू करण्याचे नियोजन सुरू आहे. तसेच डेक्कन क्वीनमधील बोगी बंद करण्याचा निर्णय रेल्वेच्या मध्यवर्ती कार्यालयाकडून घेण्यात आला आहे. तरीदेखील पुणे विभागाच्या वतीने प्रवाशांची अडचण ओळखून, करोनाकाळात बंद केलेल्या एक्सप्रेस पुन्हा सुरू करणे व अन्य बाबींकरिता प्रयत्न सुरू असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. तर रेल्वे प्रशासनही समस्या सोडविण्यासाठी सकारात्मक असल्याची माहिती मुलानी यांनी दै. “प्रभात’ शी बोलताना दिली.
=============