नव्या रूपाचे दर्शन लांबणीवर : प्रवासी हिरमुसले
पुणे – रेल्वेच्या प्रतिष्ठित गाड्यांपैकी एक असणाऱ्या डेक्कन क्वीनचे रुपडे यंदाच्या 91 व्या वर्षी पालटणार होते. 1 जूनला एलएचबी कोचचे “गिफ्ट’ मिळणार होते. मात्र, गेल्या दोन महिन्यांपासून प्रवासी रेल्वे बंद असल्याने डेक्कन क्वीन धावण्याबाबत अनेक दिवसांपासून साशंकता व्यक्त करण्यात येत आहे. परिणामी, नव्या रूपात धावणाऱ्या “डेक्कन क्वीन’चा मुहूर्त हुकणार आहे.
1 जून रोजी डेक्कन क्वीनच्या वाढदिवसाचे औचित्य साधत ही गाडी त्याच दिवसापासून एलएचबी (लिंक हॉफमन बुश) कोचसह धावेल, अशी माहिती रेल्वे सूत्रांनी मार्च महिन्यात दिली होती. परंतु, सद्य:स्थिती पाहता आता प्रवाशांना नव्या डेक्कन क्वीनची प्रतीक्षाच करावी लागणार आहे. या वृत्ताला मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी देखील दुजोरा दिला असून, डेक्कन क्वीन सुरू करण्याबाबत अद्याप नियोजन नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
डेक्कन क्वीन सध्या पांढऱ्या आणि निळ्या रंगाची आहे. येत्या काळामध्ये तिची रंगसंगती बदलण्यात येणार होती. याबाबत प्रवाशांशी संवाद साधून रेल्वे प्रशासनाकडून पाच नवीन रंगसंगतीची निवड केली होती. यासाठी अहमदाबाद येथील “नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाइन’ची निवड केली आहे. तर, एलएचबी कोच वजनाने हलके असल्याने अपघात झाल्यास जीवितहानी टळू शकणार आहे. यामुळे प्रवाशांचा प्रवास आणखी सुरक्षित होणार आहे. याशिवाय, सध्या 17 कोचची गाडी येत्या काळात 20 कोचची होणार असल्याने अधिक नागरिकांना प्रवास करता येणार आहे.
…असा आहे इतिहास
1 जून 1930 मध्ये ही एक्स्प्रेस सुरू झाली. डायनिंग कार असणारी “लक्झरी गाडी’ म्हणून या गाडीची ओळख आहे. सुरुवातीला आठवड्यातून केवळ शनिवारी आणि रविवारी धावणारी गाडी 26 एप्रिल 1943 पासून दररोज धावायला लागली. यातून रोज हजारोजण पुणे- मुंबई- पुणे प्रवास करतात. स्वातंत्र्यपूर्व काळात या गाडीतून प्रवास करण्यासाठी ब्रिटिश सरकारने केवळ अधिकारी आणि श्रीमंत नागरिकांना प्रवासाची मुभा दिली होती.
वाढदिवशी गाडी पुण्यात नाही
डेक्कन क्वीनच्या यंदाच्या 91 व्या वाढदिवसाला गाडी पुण्यात नाही, असे पहिल्यांदाच घडत आहे. सलग इतके दिवस रेल्वे बंद आहे, असे केव्हाही घडले नाही. मी मागील अनेक वर्षांपासून गाडीचा वाढदिवस पुण्यात साजरा करत आहे. डेक्कन क्वीन मुंबई विभागामध्ये आहे. त्यामुळे 1 जून रोजी पुण्यात यावी, यासाठी प्रयत्न करत आहे. योगायोगाने रेल्वे वाहतूक सुरू झाल्याने प्रशासनाने देखील डेक्कन क्वीन सुरू करून शुभारंभ केल्यास तो “दुग्धशर्करा’योग ठरेल, असे मत रेल्वे प्रवासी संघाच्या अध्यक्षा हर्षा शहा यांनी व्यक्त केले.