पूरग्रस्त जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना कर्जमाफी

सहकार विभागाच्या अवर सचिवांनी काढला आदेश

पुणे -राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे सुमारे चार लाख हेक्‍टरवरील पिकांना फटका बसला आहे. त्यामुळे बाधित शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी यंदाच्या खरिप हंगामाकरिता कर्जाऊ रक्‍कम घेतलेल्या शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याचा निर्णय सहकार विभागाने घेतला आहे. राज्य सरकारच्या सहकार विभागाचे सहनिबंधक सहकारी संस्था तथा अवर सचिव रमेश शिंगटे यांनी याबाबतचा अध्यादेश काढला आहे.

राज्यात जुलै आणि ऑगस्ट महिन्यात नद्यांना पूर आला होता. पश्‍चिम महाराष्ट्रातील सांगली, सातारा आणि कोल्हापूर या तीन जिल्ह्यांना मोठा फटका बसला आहे. याशिवाय पंढरपूर, पुणे या जिल्ह्यातील नदीकाठच्या शेतीला देखील या पुराचा फटका बसला आहे. खरिप हंगामाच्या लागवडीसाठी शेतकऱ्यांनी कर्ज घेतल्यानंतर केलेली पिकांची लागवड या पुरामुळे नष्ट झाली आहे. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात राज्यभरातून मदतीचा ओघ सुरू आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत पूरग्रस्त शेतकऱ्यांना कर्जमाफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार ही कार्यवाही सुरू करण्याचे आदेश संबधित अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

निकषाच्या आधावर कर्ज माफ होणार
राज्याच्या मदत व पुनर्वसन विभागाने ठरविलेले निकष व महसूल यंत्रणेमार्फत केलेल्या पंचानाम्याच्या आधारे निश्‍चित केलेल्या शेतकऱ्यांना ही कर्जमाफी दिली जाणार आहे. प्राथमिक कृषी पुरवठा सहकारी संस्था, राष्ट्रीयकृत बॅंका, खासगी व ग्रामीण बॅंका व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेकडून कर्ज घेतलेले शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र ठरणार आहेत. ज्या बॅंकांकडून पीक कर्ज घेतले आहेत. त्या बॅंकेच्या कर्जपीक व्याजदारानुसार एक हेक्‍टरच्या मर्यादेपर्यंत कर्जाच्या मुद्दलाची रक्‍कम व त्यावरील 31 ऑगस्ट 2019 पर्यंतच्या व्याजाची रक्‍कम माफ केली जाणार आहे. या कालावधीत डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेचा अंतर्भाव या पीक कर्जमाफीत केला जाणार नाही. या कर्जमाफीसाठी मार्गदर्शक तत्त्वे व सविस्तर निर्देश राज्याच्या सहकार आयुक्‍तांमार्फत काढले जाणार आहेत.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)