कर्ज फेररचना आजपासून सुरू

आदरातिथ्य, विमान वाहतूक, पर्यटन क्षेत्राला होणार लाभ 

नवी दिल्ली – एक ऑगस्टपासून कर्ज फेररचना करण्याची मुभा रिझर्व्ह बॅंकेने दिली आहे. मात्र, या योजनेचा केवळ आदरातिथ्य, विमान वाहतूक, पर्यटन ही क्षेत्रे उपयोग करण्याची शक्‍यता आहे. इतर उद्योग या योजनेकडे दुर्लक्ष करतील, असे बॅंकर्सना वाटते. 

ज्या कर्ज घेणाऱ्यांचे खाते 1 मार्च 2020 पर्यंत सुरळीत चालू होते. मात्र, नंतर या खात्यावर दबाव आला अशा खातेधारकांना एक वेळ कर्जाची फेररचना करता येणार आहे. यासाठी अशा कर्ज घेणाऱ्यांना 31 मार्च 2021 पर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. या विषयावर बोलताना स्टेट बॅंकेचे अध्यक्ष रजनिश कुमार यांनी सांगितले की, कर्ज व्यवस्थापनाबाबत मोठ्या कंपन्यांमध्ये बरीच वातावरण निर्मिती अगोदरच झालेली आहे. त्यामुळे मोठ्या कंपन्यांकडून कर्ज फेररचनेचा आग्रह होण्याची शक्‍यता कमी आहे.

अर्थात ही कर्ज फेररचना सरसकट नाही. प्रत्येक खाते पाहून बॅंका यासंदर्भात योग्य वाटेल तो निर्णय घेण्याची शक्‍यता आहे. ते म्हणाले की, आदरातिथ्य, विमान वाहतूक, प्रवास आणि पर्यटन याशिवाय मनोरंजन क्षेत्रातील कर्ज घेणाऱ्यांकडून कर्ज फेररचनेची मागणी होण्याची शक्‍यता आहे. एसएसएएफ स्मॉल फायनान्स बॅंकेचे व्यवस्थापकीय संचालक के. पॉल थॉमस यांनी सांगितले की, आमच्याकडून कर्ज घेणारे छोट्या रकमेचे कर्ज घेत असतात. त्यामुळे त्यांच्याकडून कर्जाच्या फेररचनेची मागणी होण्याची शक्‍यता कमी आहे. मात्र, जर कोणी नियमांतर्गत कर्जाची फेररचना मागितली तर आम्ही त्या ग्राहकाला नियमानुसार फेररचना करून देणार आहोत. 

किरकोळ कर्जाची फेररचना कमी
किरकोळ कर्ज क्षेत्रात कर्जाची फेररचना कमी होण्याची शक्‍यता असल्याचे बऱ्याच बॅंकर्सनी सांगितले. त्यातल्या त्यात जे पगारी नोकरदार आहेत, अशा लोकांनी या योजनेत कमी रस दाखविलेला आहे. अशा लोकांना ही योजना महागात पडू शकते. त्यामुळे हप्ता न देण्याच्या योजनेतही पगारदार नोकरांनी कमी भाग घेतलेला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.