-->

फसवून कर्ज लाटणारी टोळी

हप्त्यांसाठी तगादा सुरू  झाल्यावर कळते फसवणूक

पिंपरी – कोणतेही कर्ज घेतलेले नसतानाही फायनान्स कंपन्यांकडून हप्ता भरण्यासाठी तगादा सुरू झाल्यावर नागरिकांना फसवणूक झाल्याचे कळते. नागरिकांच्या नावे कर्ज काढून परस्परच ती रक्‍कम लाटणारी टोळी शहरात अनेकांची फसवणूक करत असल्याची माहिती पुढे आली आहे. या टोळीने अनेक नागरिकांची फसवणूक केली असून आता हे नागरिक पोलिसांकडे धाव घेणार आहेत.

तुम्हाला वैयक्‍तिक कर्ज काढून देतो, असे सांगत नागरिकांकडून कागदपत्र घेतली जातात. त्यानंतर नागरिकांच्या नावावर कोणतीतरी वस्तू खरेदी केल्याचे दाखवून ते पैसे परस्पर लाटले जातात. यामध्ये शहरातील काही दुकानदारांचाही समावेश आहे. आत्तापर्यंत या टोळीने शेकडो जणांच्या नावावर लाखो रुपयांचे कर्ज काढल्याचे समोर आले आहे.

चिंचवडगावातील सचिन कसबे या रिक्षा चालकाला आपल्या गाडीचा विमा काढणे तसेच पासिंग करण्यासाठी 20 हजार रुपयांची आवश्‍यकता होती. मार्च महिन्यात त्याची ओळख तोंडओळखीच्या आरोपीशी झाली. वैयक्‍तिक कर्ज देतो, असे सांगून आरोपीच्या टोळीने कसबे यांच्याकडून आधारकार्ड आणि पॅनकार्ड मोबाइलवर घेतले. तुमची प्रोसेस सुरू असल्याचे त्यास सांगण्यात आले. मात्र गेल्या महिन्यापासून एका फायनान्स कंपनीकडून तुम्ही काढलेल्या कर्जाचे हप्ते भरा, असे धमकावण्यात येत आहे. मात्र आपण कोणतेही कर्ज घेतले नसल्याचे कसबे यांनी सांगितले. मात्र एका दुकानातून तुम्ही वस्तू खरेदी केली असून त्यासाठी तुम्ही कर्ज घेतल्याचे संबंधित फायनान्स कंपनीकडून सांगण्यात आले.

रोहिणी कळसकर या टेलरिंगचा व्यवसाय करतात. त्यांना आपल्या व्यवसाय वाढविण्यासाठी पैशाची आवश्‍यकता होती. याच टोळीने त्यांना कर्ज देण्याच्या आश्‍वासन देऊन कागदपत्रे घेतली. कळसकर यांना कर्ज तर मिळाले नाही, परंतु आता त्यांच्या मागे बॅंकेचे हप्ते भरण्यासाठी तगादा लावला जात आहे. आम्ही कोणताही फार्म भरलेला नसताना आमच्या नावाने कर्ज दिलेच कसे, असा प्रश्‍न आता फसवणूक झालेले नागरिक विचारत आहेत. फसवणूक झालेल्या काही नागरिकांनी संशयित आरोपींना जाब विचारला असता त्याने काळाखडक येथील एका गुंडाच्या नावाने धमकी दिली.

दुकानदारही सहभागी?
चिंचवडगावातील सुमारे 15 जणांनी कर्ज काढून आकुर्डी येथील एका मोबाइलच्या दुकानातून वेगवेगळ्या वस्तू घेतल्या असल्याचे सांगण्यात येत आहे. वास्तविक पाहता ज्या दुकानातून खरेदी केल्याचे दाखविले आहे ते दुकान फक्‍त मोबाइल विक्रीचे आहे. मात्र आरोपी आणि दुकानदाराने आपसांत संगनमत करून मोबाइल विक्रीच्या दुकानात टिव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन खरेदी केल्याचे दाखविले आहे. यामुळे हा दुकानदारही बनावट कर्ज प्रकरणात सहभागी असल्याचे दिसून
येत आहे.

नागरिकांचे मोठे नुकसान
एकीकडे गरज असताना नागरिकांना कर्ज मिळाले नाही आणि दुसरीकडे न घेतलेल्या कर्जाचा मनःस्ताप नागरिकांना सहन करावा लागत आहे. एवढेच नव्हे तर फसवणूक करणाऱ्या टोळीमुळे सामान्य नागरिकांचे सिबिल रेकॉर्ड खराब होत आहे. तसेच हफ्ते थकविल्यामुळे त्यांची “पत’ही खराब झाली आहे. भविष्यात त्यांना कोणतेही कर्ज किंवा क्रेडिट घेताना त्रास होऊ शकतो.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.