वाशिंग्टन – अमेरिकेचे उपाध्यक्ष माईक पेन्स आणि डेमोक्रॅटिक पक्षाकडून उपाध्यक्ष पदासाठीच्या उमेदवार कमला हॅरिस यांच्यातील पहिला वादविवाद आज होणार आहे.
अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना करोनाची लागण झाली होती त्यामुळे अध्यक्षपदाच्या उमेदवारांऐवजी उपाध्यक्षपदाच्या उमेदवारांमध्ये हा वादविवाद होणार आहे.
कमला हॅरिस यांच्या आई भारतीय आणि वडील जैमैकाचे नागरिक होते. डेमोक्रॅटिक पक्षाकडून उपाध्यक्षपदाच्या उमेदवार म्हणून ऑगस्ट महिन्यात निवडण्यात आल्यामुळे त्यांच्या नावावर ऐतिहासिक कामगिरीची नोंद झाली आहे.
उपाध्यक्षपदाच्या उमेदवारांमध्ये होणाऱ्या वादविवादामध्ये भारतीय वंशाच्या महिलेचा सहभाग होण्याची ही आतापर्यंतच्या इतिहासातील पहिलीच वेळ असणार आहे. उटाहमधील सॉल्ट लेक सिटीमध्ये हा वादविवाद रंगणार आहे.
पहिल्या वादविवादामध्ये जो बिडेन यांनी अध्यक्ष ट्रम्प यांच्यावर सरशी मिळवली होती. हॅरिस स्वभावतःच आक्रमक असल्याने पेन्स यांच्यावर त्या देखील मात करतील, असा निरीक्षकांचा अंदाज आहे.