– राजेंद्र काळभोर
लोणी काळभोर – पुणे- सोलापूर महामार्ग बांधकाम विभागाकडे हस्तातंरण करून पाच महिने उलटले तरी समस्यांचा डोंगर तसाच पडून आहे. बांधकाम विभागाच्या निद्रिस्त धोरणामुळे गेल्या महिन्यांत कदमवाकवस्ती येथे अपघातात नऊ जणांचा बळी गेला होता. त्यानंतर बांधकाम विभागात सुधारणा होईल, अशी अपेक्षा होती. अधिकाऱ्यांना अपघातांचे गांभीर्य नाही. उपाययोजना करण्याची फुरसत मिळत नाही. त्यामुळे सोलापूर महामार्गावरील समस्या “जैसे थे’ आहेत. गेल्या महिन्यात अपघात घडल्यानंतरही प्रशासनाला जाग आली नसल्याने अजून किती जणांचा बळी घेणार, असा संतप्त सवाल प्रवाशांतून व्यक्त होत आहे.
आर्यन टोल रोड प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने सोलापूर महामार्गावरील कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायतीच्या हद्दीतील कवडीपाट ते कासुर्डी (ता. दौंड) भागातील चारपदरी रस्त्याचे काम (बीओटी) तत्वावर केले होते. 15 वर्षे टोल वसुली सुरू होती. टोलवसुलीची मुदत दि. 10 मार्च रोजी संपली. शासनाच्या नियमांप्रमाणे कंपनीने रस्त्याची दुरुस्ती केली असली तरी प्रवाशांना शौचालय, मुख्य चौकातील दिवे, काही ठिकाणी सेवा मार्गावर संरक्षक जाळ्या, रूग्णवाहिका आदी सुविधांसाठी नियम पायदळी तुडविल्या आहेत. कंपनीने असमर्थता दाखवली. कंपनी कवडीपाट, कदमवाकवस्ती, लोणी काळभोर (ता. हवेली) येथे व कासुर्डी (ता. दौंड) दोन टोलनाक्यावर वसुली करीत होती. ज्या गांभीर्याने टोल वसुली केली. त्या गंभीर्याने प्रवाशांना सुविधा उपलब्ध करून दिल्या नसल्याचे अपघातांचे सत्र सुरू झाले आहे. कंपनीने ठिकठिकाणी स्थानिकांच्या सोयीसाठी सेवा रस्ते तयार केले होते.
या रस्त्यांवर काही व्यावसायिक, नागरिक कचरा आणून टाकत आहेत. चिकन विक्रेते व व्यापारी कागद, कचरा रोडवर टाकत आहेत. याला पायबंद घातला जात नाही. सुविधा “रामभरोसे’ आहेत. लोणी काळभोर पुलानजीक प्रचंड कचरा आहे. हा कचरा खाण्यासाठी कुत्री, डुकरांचा वावर आहे. महामार्गावरील वाहतुकीचा धोका पत्करायला नको म्हणून महिला, मुले, वयोवृद्ध नागरिक या रस्त्याचा वापर करीत आहेत. हस्तांतरणानंतर “बांधकाम’च्या अधिकाऱ्यांनीही दुर्लक्ष
केले आहे.
सुविधा कधी मिळणार?
महामार्गावरून दररोज हजारो लहान-मोठी वाहने ये-जा करत असतात. परंतु महिलांसाठी एकही शौचालय दोन टोलनाक्यादरम्यान अद्यापही उपलब्ध नाहीत. कवडीपाट टोलनाक्यावर पुरुषांसाठी एक शौचालय आहे. परंतु त्याचे पाणी टोलनाक्याशेजारी रस्त्याच्या कडेला सोडले आहे. ड्रेनेजची व्यवस्थाही नाही. कवडीपाट टोलनाका ते कासुर्डी टोलनाका, यवत यादरम्यान, एकही शौचालयाची उभारणी कंपनीने केली नाही. 2004 मध्ये महामार्ग व सेवा रस्त्याच्यामध्ये टाकलेली लोखंडी जाळी गायब झाली आहे. फूटपाथही तुटला आहे. फुटपाथ दुरूस्तीची तसदी घेतली नव्हती. रूग्णवाहिका नाही. 27 किलोमीटर अंतरात दोनच ठिकाणी दिवे बसविले आहेत.