रस्ते दुभाजक बनलेत मृत्युचा सापळा

अपघातग्रस्त वाहने दोन-दोन दिवस महमार्गावरच; अपघातांची संख्या वाढले

सासवड – आळंदी ते पंढरपूर (965) पालखी महामार्गावरील सासवड शहरामधून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर सार्वजनिक बांधकाम विभागाने बसविलेले दुभाजक म्हणजे असून अडचण नसून खोळंबा बनले आहेत. शहरातील वाहतूककोंडी कमी व्हावी व वाहतुकीला शिस्त लागावी यासाठी नागरिकांनी कित्येक वर्षांपासून मागणी केल्यानंतर अखेर राष्ट्रीय पालखी महामार्गावर प्रशासनाने दुभाजक बसविण्याचा घाट घातला. मात्र, हे दुभाजक खरच केंद्र शासनाने ठरवून दिलेल्या निर्देशानुसार बसविलेली आहेत का? हा एक संशोधनाचाच विषय बनला आहे. चुकीच्या पद्धतीने बसविलेल्या दुभाजकांमध्ये वाहनचालकांना वाहने चालवताना प्रचंड मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.

या दुभाजकास कोणतेही रिफ्लेक्‍टर नसल्याने वाहने दुभाजाकावरच जाऊन जोरात आदळून सलग तीन दिवस अपघात झाले आहेत. सुदैवाने या तिन्ही अपघात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी ट्रक, टॅंकर आणि कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कोणताही दोष नसताना शासकीय अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणाचा फटका वाहनचालकांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे या अधिकाऱ्यांच्या मनमानीला चाप कोण लावणार? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

सासवडमध्ये राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या कंत्राटदाराने नुकतेच हे दुभाजक बसविले आहेत, परंतु अत्यंत चुकीच्या पद्धतीने आणि नियमांचे उल्लंघन करून हे काम करण्यात आले आहे. अनेक ठिकाणी शाळा, महाविद्यालय, स्थानिक सोसायट्या, बाजारपेठ, एसटी बस स्थानक, पीएमटी बस स्थानक, नगरपालिका आणि महत्वाचे ठिकाणे असताना संपूर्ण रस्त्यावर असे दिशादर्शक फलक लावले गेले नाहीत. अशा निकृष्ट कामांमुळे सर्वच वाहनचालक वैतागले असून अशा अपघातांना जबाबदार धरून बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करून त्यांच्याकडून नुकसानभरपाई वसूल करण्याची मागणी केली जात आहे. याबाबत सार्वजनिक रस्ते बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता संबंधित अधिकाऱ्यांचे फोन बंद होते. एकूणच या सर्व प्रकारांमधून सोयीस्करपणे अंग काढून घेण्याचा प्रकार असल्याचेच दिसून येत आहे.

नगरपालिकेने देखील पाठपुरावा करणे गरजेचे
सासवड नगरपालिकेकडे सासवडच्या नागरिकांचे पालकत्व आहे. ज्या शहरातून हा पालखी महामार्ग जातो, त्या पालखी महामार्गाच्या सुरक्षिततेची सर्वस्वी जबाबदारी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची असली तरी देखील नगरपालिकेने ही याबाबतीत लक्ष देणे तितकेच गरजेचे आहे. केवळ राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण पत्रव्यवहार केला आहे असे नगरपालिकेचे मुख्याधिकारी वारंवार सांगतात. केवळ पत्रव्यवहाराने प्रश्‍न सुटणार नाही तर नगरपालिका, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि पोलीस प्रशासन या सर्व विभागांचा समन्वय गरजेचा आहे.

टॅंकर पेट्रोलने भरलेला असता तर?
मंगळवारी (दि. 16) सकाळी सासवड एसटी स्थानकासमोर दुभाजकाला धडकलेला पेट्रोलचा टॅंकर हा सुदैवाने रिकामा होता. मात्र, ट्रॅंकर भरलेला असता तर मोठी जीवित व वित्तहानी झाली असती. टॅंकर रिकामा होता म्हणून मोठा अनर्थ टळला.

महामार्ग म्हटले की अपघात हे होणारच. त्याला आम्ही काय करू शकतो. जर दुभाजकाच्या सुरुवातीला भोंगळे पेट्रोल पंप व पीएमटी बस स्टॉपसमोर या दोनच ठिकाणी रिफ्लेक्‍टर लावण्याचे आदेश आम्हाला दिले गेले आहेत तर आम्ही काय करणार.
– श्रुती नाईक, अभियंता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)