इस्लामाबाद – पाकिस्तानात गेल्या सहा आठवड्यांपासून सुरू असलेला पाऊस आणि अचानक आलेल्या पुरामुळे मृतांची संख्या १५६ वर पोहोचली आहे. देशाच्या बऱ्याच भागात मुसळधार पाऊस सुरू असल्याने काही गावांमध्ये पाणी शिरले आणि भूस्खलन झाले असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
दिनांक १ जुलैला मान्सूनचा पाऊस सुरू झाल्यापासून १,८०० हून अधिक घरांचे नुकसान झाले आहे. नैऋत्य बलुचिस्तान प्रांतातील दुर्गम भागातील फळबागांचेही नुकसान झाले असून, पूर्वेकडील लाहोर शहरातील अनेक रस्त्यांवर पावसामुळे पाणी साचले आहे, असे राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने सांगितले.
आपत्ती एजन्सी आणि प्रांतीय अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार १५६ पैकी बरेच मृत्यू पूर्व पंजाब आणि वायव्य खैबर पख्तुनख्वा प्रांतात झाले आहेत. पावसाशी संबंधित घटनांमध्ये जवळपास ३०० लोक जखमी झाले आहेत आणि अधिकारी पावसाने प्रभावित झालेल्या लोकांना मोफत अन्न आणि वैद्यकीय सेवा पुरवत आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
पाकिस्तानमध्ये वार्षिक मान्सून हंगाम सुरू आहे हा हंगाम जुलै ते सप्टेंबर पर्यंत चालतो. अलिकडच्या वर्षांत झालेल्या अतिवृष्टीसाठी शास्त्रज्ञ आणि हवामानाचा अंदाज वर्तविणारे हवामान बदलाला जबाबदार धरतात. २०२२ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमध्ये देशाचा एकतृतीयांश भाग पाण्याखाली गेला होता. या भीषण जलप्रलयामुळे पाकिस्तानचे तब्बल ३० अब्ज डॉलरचे नुकसान झाले होते.