नलगोंडा – शेत मजुरीसाठी जाणाऱ्या महिला मजुरांनी भरलेल्या एका रिक्षाला कंटेनर ट्रकने धडक दिल्याने काल झालेल्या अपघातातील मृतांची संख्या आता नऊ झाली आहे.
काल सात महिला मजुर ठार झाल्या होत्या तर अन्य अनेक जणी जखमी झाल्या होत्या. त्यातील दोन जणींचे आज रूग्णालयात उपचार सुरू असताना निधन झाल्याने ही संख्या आता नऊवर गेली आहे.
या अपघातातील एकूण 11 जणांवर रूग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिसांनी ट्रक चालकाला अटक केली असून हा अपघात घडला त्यावेळी तो दारू प्यायलेल्या अवस्थेत होता असे सांगितले जाते.
या अपघातात रिक्षा चालक ठार झाला असून या रिक्षात एकूण 20 प्रवासी बसलेले होते. त्या प्रवाशांमध्ये बहुतांशी महिला मजुरच होत्या. दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक झाली. त्यामुळे मोठ्या प्रमाणात जीवित हानी झाली आहे.