जालना – जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातल्या वलखेडा गावातील दगड खाणीत स्फोट झाल्याने दोन सख्ख्या भावांचा मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली आहे. शुभम धोत्रे (8) आणि शिवराज धोत्रे (6) अशी मृतांची नावे आहेत. ही दुर्दैवी घटना मंगळवारी दुपारी घडली.
गावातील वलखेडा शिवारात गट क्रमांक 22 मध्ये दगडाची खदान आहे. या खाणीत धोत्रे कुटुंब दगड फोडण्याचे काम करत होते. दुपारच्या वेळी शुभम आणि शिवराज ही भावंडे खाणीजवळ खेळत असताना जुन्या खाणीत लावलेल्या स्फोटकांचा अचानक स्फोट झाला. या स्फोटात दगडांचा मार लागल्याने या मुलांचा जागीच मृत्यू झाला.
ही घटना घडली तेव्हा धोत्रे पती-पत्नी हे त्याच खाणीत ट्रॅक्टरच्या दुसऱ्या बाजूला दगड भरण्याचे काम करीत असल्यामुळे वाचले. याप्रकरणी अंबड पोलिसात चंद्रकांत लाड यांच्या माहितीवरुन आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.