26/11च्या हल्ल्यातून बचावलेले पास्टर यांचा भीषण अपघातात मृत्यू

वसई – 26/11च्या मुंबई हल्ल्यात दहशतवादी कसाब आणि त्याच्या साथीदारांनी केलेल्या हल्ल्यातून वाचलेले पास्टर आणि त्यांच्या परिवारावर काळाने घाला घातला आहे. काल 2 जुलै रोजी वसईत मुंबई अहमदाबाद महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात प्रोटेस्टंट पंथाचे पास्टर डॉक्‍टर थॉमस उलेदर यांचा मृत्यू झाला. दुर्देवाची बाब म्हणजे या अपघातात त्यांच्या दोन मुलांचा देखील मृत्यू झाला.

नायगांव येथे राहणारे प्रोटेस्टंट पंथाचे पास्टर डॉक्‍टर थॉमस उलेदर हे पत्नी मेरीसह मुलगा बेनी आणि इझायल यांच्यासोबत कारने प्रवास करत होते. ते विरारला आपल्या नातेवाईकाकडे एका कार्यक्रमासाठी जात होते.

गुजरात लेनवरन जाताना पाठीमागून भरधाव वेगात येणाऱ्या एका टेम्पोने त्यांच्या कारला भीषण धडक दिली. ही धडक इतकी भयानक होती की, कार दुसऱ्या मुंबई लेनवर येऊन पडल्यानंतर दुसऱ्या टेम्पोने पुन्हा उडविले. या अपघातात पास्टर डॉक्‍टर थॉमस उलेदर आणि त्यांची दोन मुले जागीच ठार झाली. तर पत्नी मेरी गंभीर जखमी झाल्या आहेत.

त्यांच्यावर वसईच्या प्लॅटिनम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा अपघात वसईच्या सातीवली ब्रिजवर काल सायंकाळी साडेसहा वाजता झाला. फरार टेम्पोला पालघर जिल्ह्यातील कासा पोलिसांनी चालकाला अटक केली आहे.

दरम्यान, 26/11ला कामा हॉस्पिटलमध्ये कसाब आणि अबू इस्माइल यांच्या गोलीतून डॉक्‍टर थॉमस उलेदर वाचले होते. आपल्या बहिणीच्या डिलीवरीसाठी तेथे गेले होते. त्यावेळेस डॉक्‍टर थॉमस उलेदर सोबत त्यांचे भावजी आणि मित्र होते. त्या तिघांना कसाब आणि अब्बू इस्माइल याने बंधक बनवले होते. मात्र त्यातून हे तिघे आश्‍चर्यकारकरित्या वाचले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.