नवी दिल्ली -गुजरातमधील अहमदाबादच्या एटीएसने शनिवारी रात्री बदायूं जिल्ह्यात छापा टाकून आदर्श नगर मोहल्ला येथे राहणाऱ्या तरुणाला ताब्यात घेतले. तरुणाने पंतप्रधान कार्यालयाला (पीएमओ) मेल करून पंतप्रधानांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचे सांगण्यात येत आहे.ताब्यात घेतलेल्या तरुणाची चौकशी एटीएसकडून करण्यात येणार आहे.
सिव्हिल लाइन्स पोलिस स्टेशनमध्ये मीडिया कर्मचाऱ्यांची गर्दी पाहून एटीएसने तरुणाला एसएसपीच्या निवासस्थानी नेले. तेथे त्याची चौकशी करण्यात येत आहे. गुजरातमधील अहमदाबाद येथून एटीएस अधिकारी शनिवारी रात्री दिल्लीमार्गे बदाऊनला पोहोचले.समोर आलेल्या माहितीनुसार, एटीएसने स्थानिक पोलिसांसह आदर्श नगर परिसरात रात्री 10 वाजण्याच्या सुमारास छापा टाकून अमन सक्सेना नावाच्या तरुणाला ताब्यात घेतले.
एटीएसने तरुणाला सिव्हिल लाइन्स पोलिस ठाण्यात नेले, तेथे त्याची सुमारे तासभर चौकशी करण्यात आली. त्याने पंतप्रधान कार्यालयाला ईमेल करून पंतप्रधान नरेंद्र मोदींना जीवे मारण्याची धमकी दिल्याचे सांगण्यात येत आहे. यामध्ये गुजरातमधील एक मुलगी आणि दिल्लीतील एका मुलासह तीन जणांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे.