Kolkata Doctor Case | कोलकाता बलात्कार हत्याकांडप्रकरणी दोषी ठरलेले संजय रॉयला आज शिक्षा सुनावली जाणार आहे. शनिवारी (18 जानेवारी) सियालदह सत्र न्यायालयाने हा निकाल दिला. विशेष न्यायालयाचे कामकाज सोमवारी दुपारी 12 वाजता सुरू होणार आहे. कारवाईच्या सुरुवातीला न्यायाधीश रॉय आणि पीडितेच्या पालकांना या खटल्याबद्दल त्यांचे अंतिम मत मांडण्याची परवानगी देतील. यानंतर विशेष न्यायालयाचे न्यायाधीश या खटल्यातील शिक्षेची घोषणा करतील.
या प्रकरणात आता त्याला फाशीची शिक्षा होणार की जन्मठेप हे स्पष्ट होणार आहे. सीबीआयने दोषीला फाशी देण्याची मागणी केली आहे. तर दुसरीकडे, संजय रॉयचे वकील त्याला जन्मठेपेची शिक्षा देऊन मानवतावादी आधारावर सोडण्याचे आवाहन करणार आहेत. बलात्कार आणि हत्येप्रकरणी रॉय याच्याविरोधातील शिक्षेची प्रक्रिया आज पूर्ण होणार आहे. परंतु या प्रकरणातील पुराव्यांबाबत ‘छेडछाड’ आणि ‘फेरफार’बाबत केंद्रीय अन्वेषण विभागाकडून तपास सुरूच राहणार आहे. Kolkata Doctor Case |
दोषी ठरल्यानंतर संजय रॉय काय म्हणाला?
दरम्यान, कोलकात्याच्या सियालदाह न्यायालयात दोषी ठरल्यानंतर संजय रॉयने मला खोट्या आरोपांमध्ये अडकवण्यात आले आहे. हा गुन्हा मी केलेला नाही. खरे गुन्हेगार मोकाट सुटत असल्याचे म्हंटले होते. भारतीय न्यायिक संहितेच्या (BNS) कलम 64 (बलात्कार) आणि कलम 66 आणि 103 (1) (हत्या) अंतर्गत संजय रॉय दोषी आढळला. कलम 103 (1) अंतर्गत कमाल शिक्षा मृत्यू किंवा जन्मठेपेची आहे. Kolkata Doctor Case |
नेमकं प्रकरण काय?
गेल्या वर्षी ९ ऑगस्ट रोजी एका महिला प्रशिक्षणार्थी डॉक्टरचा मृतदेह सापडला होता. आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलच्या सेमिनार हॉलमध्ये हा मृतदेह आढळून आला. या प्रकरणी दुसऱ्याच दिवशी पोलिसांनी नागरी स्वयंसेवक संजय रॉयला अटक केली. या प्रकरणाचा प्राथमिक तपास कोलकाता पोलिसांच्या विशेष तपास पथकाने केला, नंतर तपास सीबीआयने हाती घेतला आणि शहर पोलिसांनी रॉयला केंद्रीय एजन्सीच्या अधिकाऱ्यांकडे सोपवले. Kolkata Doctor Case |
164 दिवसांनी सुनावली जाणार शिक्षा
दरम्यान, गेल्या वर्षी 11 नोव्हेंबरपासून या प्रकरणाची सुनावणी सुरू झाली होती. या प्रकरणाची सुनावणी सुमारे 57 दिवस चालली. यात सीबीआयने 120 हून अधिक साक्षीदारांचे जबाब नोंदवले.गुन्ह्याच्या तारखेपासून 162 दिवसांनी दोषी ठरविण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. आता गुन्ह्याच्या तारखेपासून बरोबर 164 दिवसांनी सोमवारी शिक्षा सुनावण्यात येणार आहे.
हेही वाचा:
‘आवडीसह व्यावसायिकता जपणे आवश्यक..:, दिग्दर्शक फराह खान यांचे प्रतिपादन