साताऱ्यातील रस्त्यांवर घोंगावतोय मृत्यू

मयूर सोनावणे
सातारा  – गेल्या काही वर्षांपासून सातारा शहरातील मुख्य रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून रस्त्यांवर मोठमोठे महाकाय खड्डे पडले आहे. या महाकाय खड्ड्यांमुळे साताऱ्यातील रस्त्यांवर सध्या जणूकाही मृत्यूच घोंगावत असल्याची परिस्थिती निर्माण झाली असून वाहनधारकांचा जीव अक्षरश: टांगणीला लागला आहे.

गुरुवारी सव्वादोन वाजता शाहू स्टेडियमनजीक भूविकास बॅंकेसमोरील रस्त्यावरुन निघालेला टेम्पो पावसाच्या पाण्यामुळे रस्त्यातील खड्ड्याचा अंदाज न आल्याने जाग्यावरच पलटी झाला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. विशेष म्हणजे याच रस्त्यावर दोन दिवसांपूर्वी महिलेची स्कूटी खड्ड्यात आदळून दोन तुकडे झाले होते. त्यानंतरही कोणतीच उपाययोजना संबंधितांकडून करण्यात आलेली नाही.

साताऱ्याची ओळख ही ऐतिहासिक सातारा, पेन्शनरांचा सातारा यासह अनेकविध चांगल्या गोष्टींसाठी आहे. मात्र सध्याच्या परिस्थितीत साताऱ्याची ओळख ही खड्ड्यांचा सातारा अशी बनू लागली आहे. आणि त्याला सर्वस्वी प्रशासनच जबाबदार असल्याची खंत दस्तुरखुद्द सातारकरांमधून व्यक्त केली जात आहे.

गेल्या दीड-दोन वर्षांपासून सातारा सुरु असलेले ग्रेडसेप्रेटरचे काम तसेच आणखी काही ठिकाणी सुरु असलेली पुलाची, रस्त्यांची कामे यामुळे शहरातील रस्त्यांवर वाहतुकीचा प्रचंड ताण आला आहे. शिवाय दर्जाहिन कामांचे पितळही उघडे पडले आहे. शहरातील अनेक रस्त्यांची वारंवार कामे होत आहेत. मात्र, कामे झाल्यानंतर काही दिवसांमध्येच पुन्हा त्या रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडून रस्ता वाहतुकीलायकदेखील राहत नाही. मात्र, तरीही पुन्हा पुन्हा त्याच त्याच ठेकेदारांना कामे देऊन ठेकेदार पोसण्याचे प्रकार प्रशासनाकडून सुरु आहे.

सध्या पावसाळा सुरु असल्याने आधीच दर्जाहिन झालेल्या रस्त्यांची पावसामुळे भयावह परिस्थिती झाली आहे. सातारा शहरातील बसस्थानक परिसरातील तसेच शाहुस्टेडियम परिसर, पोवईनाका ते बॉम्बेरेस्टॉरंट रोड, मोनार्क चौक, राधिका रोड, पोवईनाका ते साईबाबा मंदिर यासह मुख्य रस्त्यांवरही मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहे. मोठ्या प्रमाणात रुंद आणि खोल पडलेल्या या खड्ड्यांमुळे वाहनधारकांना वाहने चालविणेही जिकीरीचे झाले आहे. पावसाच्या पाण्यामुळे खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने वाहनधारकांचा जीव टांगणीला लागला आहे.

निर्ढावलेल्या प्रशासनाला जाग येईल का?

शहरातील रस्त्यांची रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. जणूकाही संपूर्ण सातारा खड्ड्यात गेल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र, तरीदेखील प्रशासनाच्या संबंधित विभागाकडून मुरुम भरणे, तात्पुरती मलमपट्टी करण्यासारखे केविलवाणे प्रकार सुरु आहे. दोन दिवसांत दोन वाहने खड्ड्यांचा अंदाज न आल्याने रस्त्यावर पलटी झाल्याच्या घटना शहरात घडल्या असतानाही त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने निर्ढावलेल्या या प्रशासनाला जाग येईल का? असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.