रायपुर – छत्तीसगड मध्ये सुकमा जिल्ह्यात मंगळवारी सकाळी पोलिसांबरोबर झालेल्या चकमकीत एक महिला नक्षलवादी ठार झाली. जिल्ह्यातील दब्बाकोंता गावात ही चकमक झाली. त्या गावाजवळच्या जंगलात माओवाद्यांचा कॅम्प असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तेथे नाकाबंदी केली होती त्यावेळी ही चकमक झाली. त्यात ही महिला नक्षलवादी ठार झाली बाकीचे नक्षलवादी जंगलात पळून गेले.
तिच्या मृतदेहाजवळ एक इन्सास रायफल आढळून आली. तिची ओळख मात्र अजून पटलेली नाही. आता पळून गेलेल्या नक्षलवाद्यांचा शोध घेतला जात असून त्या कामी सीआरपीएफ च्या कोब्रा बटालियनची मदत घेतली जात आहे. अन्य नक्षलवाद्यांचा बंदोबस्त होईपर्यंत ही कोब्रा बटालियन त्या भागातच तैनात ठेवली जाणार आहे.