पुणे – रेडिओ खगोलशास्त्राचे प्रणेते आणि पुण्यातील नॅशनल सेंटर फॉर रेडिओ एस्ट्रोफिजिक्स (एन.सी.आर.ए.) संस्थेचे संस्थापक संचालक डॉ. गोविंद स्वरूप यांचे सोमवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास निधन झाले. ते 91 वर्षांचे होते. अशक्तपणा व इतर आजारामुळे गेल्या दहा दिवसांपासून ते खाजगी रुग्णालयात उपचार घेत होते.
‘भारतातील रेडिओ खगोलशास्त्राचे प्रणेते’ अशी त्यांची ओळख होती. त्यांनी खगोलशास्त्राच्या अभ्यासकांचा गट तयार करून या क्षेत्रातील संशोधनाला चालना दिली. पुण्यापासून 80 किलोमीटर अंतरावर असलेल्या खोडद-नारायणगाव येथे जगातील दुसऱ्या क्रमांकाची महाकाय रेडिओ दुर्बीण उभारण्याचे काम त्यांनी केले.
डॉ. गोविंद स्वरुप यांच्या मार्गदर्शनाखाली भारतातील पहिली आधुनिक रेडिओ दुर्बीण मुंबईजवळील कल्याणच्या परिसरात उभारण्यात आली. या दुर्बिणीच्या सहाय्याने सूर्याची निरीक्षणे घेण्यात आली.
त्यानंतर डॉ. गोविंद स्वरूप यांनी दक्षिण भारतात उटी येथेही रेडिओ दुर्बीण उभारली. गोविंद स्वरूप यांना पद्मश्री, भटनागर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यांच्या पार्थिवावर सोमवारी अंत्यसंस्कार करण्यात आले.