हलगर्जीपणाचा आरोप ः तीन डॉक्टरांवर गुन्हा दाखल
चाकण – येथील एका रुग्णालयात प्रसूतीदरम्यान महिलेचा व नवजात अर्भकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली. येथील तीन डॉक्टरांवर चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. एका खासगी रुग्णालयात गर्भवती महिलेवर प्रसूतीकामी उपचार सुरू असतानाच संबंधित महिलेसह मुलगी असलेल्या अर्भकाचाही मृत्यू झाल्याची घटना घडली. सपना सुधीर पवळे (वय 29, रा. शिक्रापूर, ता. शिरूर; मूळ रा. वाकळवाडी, ता. खेड), असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे.
याप्रकरणी सुधीर मच्छिंद्र पवळे यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. डॉक्टरांच्या हलगर्जीपणाने व चुकीच्या औषधी गोळ्या, इंजेक्शन, सलाईन आणि इतर उपचार केल्याचा आरोप महिलेच्या नातलगांनी केला आहे. ही घटना आज सकाळी घडली. संबंधित महिलेला प्रसूतीसाठी गुरुवारी रूग्णालयात दाखल केले होते. रूग्णालयाबाहेर मृत महिलेचे नातलग आक्रमक झाले होते. यावेळी चाकण पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. नातेवाईकांनी महिलेचा मृतदेह रूग्णालयासमोरच रुग्णवाहिकेत ठेवला होता. डॉक्टरला अटक केल्याशिवाय रुग्णवाहिका हलणार नाही, अशी भूमिका नातेवाईकांनी घेतली. पोलीस निरीक्षक सुनील पवार यांनी जमावाशी चर्चा केली. त्यानंतर तणाव निवळला.