दोन लाखांच्या बदल्यात 22 लाखांची वसुली

अखेर त्या खासगी सावकारावर गुन्हा

कोरेगाव  – सर्वसामान्य औषध विक्रेता असलेल्या विशाल गोरखनाथ ढोक याला दहा टक्के व्याजदराने दोन लाख देऊन अवघ्या दोन वर्षात त्यापोटी 21 लाख 68 हजार रुपये उकळणाऱ्या खासगी सावकार दीपक भालचंद्र फाळके याच्या विरोधात कोरेगाव पोलीस ठाण्यात रविवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत दै. प्रभातमधून शनिवार दि. 4 रोजी “कोरेगावात खासगी सावकाराचा दिवा फडफडतोय’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिध्द करण्यात आले होते.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, विशाल ढोक यांचे कोरेगाव शहरात साखळी पुलानजिक कल्पराज कॉम्प्लेक्‍समध्ये तळमजल्यावर मेडिकल स्टोअर्स आहे. स्टोअर्सच्या जोडीला कोरेगाव एम.आय.डी.सी.मध्ये मेडिकल बॅंडेजचा कारखाना काढण्यासाठी त्यांनी तोंडओळख असलेल्या दीपक भालचंद्र फाळके, रा. संभाजीनगर-कोरेगाव
याच्याकडून महिना दहा टक्के व्याजदराने पैसे घेतले होते. दि. 11 सप्टेंबर 2017 रोजी मेडिकल दुकानात दीपक फाळके याने दोन लाख रोख दिले. रक्कम देताना दीपकने विशालकडून एच.डी.एफ.सी. बॅंकेचे दोन कोरे धनादेश सही करुन घेतले. त्यानंतर दि.

11 ऑक्‍टोबर 2017 रोजी महिना भरल्यानंतर दीपक फाळके याच्या घरी जाऊन विशाल यांनी 20 हजार दिले होते तर 11 नोव्हेंबर 2017 रोजी दोन लाख मुद्दल व व्याजाचे 20 हजार असे एकूण 2 लाख 20 हजार देऊन व्यवहार संपला असे सांगितले. यावेळेस कोरे धनादेश परत मागितल्यावर उद्या दुकानावर आणून देतो, असे फाळके याने सांगितले. दि. 12 नोव्हेंबर 2017 रोजी मेडिकल स्टोअर्समध्ये दीपक फाळके गेला आणि त्याने तुझे कोरे धनादेश देणार नाही व दिलेले 2 लाख 20 हजार यावर आठवडा 20 टक्के व्याजदाराने गेल्या महिन्याचे व्याज व दंड असे झाले आहे. यापुढे आठवड्याला 20 टक्के व्याज द्यावे लागेल व मी आठवड्याला दर बुधवारी व शनिवारी रक्कम घ्यायला येणार असा दम दिला होता. त्यावेळी 20 हजार रुपये दिले पाहिजेत, अशी दमदाटी करुन फाळके हा निघून गेला.

यानंतर दीपक फाळकेला आजवर रोखीने व मोबाईल ट्रान्झॅक्‍शनने 21 लाख 68 हजार रुपये दिले असल्याचे विशाल यांनी दिले आहेत. विशेष म्हणजे अनेक रकमा धनादेश व मोबाईल ट्रान्सफरद्वारे दिलेल्या असताना दीपक फाळके याने पुन्हा विशाल यांच्या खात्यावर वर्ग केल्या आणि पुन्हा रोखीने नेल्या आहेत. या व्यवहाराला विरोध केला असता, शिवीगाळ दमदाटी करुन जीवे मारण्याची धमकी दिल्याचे विशाल ढोक यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अविनाश राठोड करत आहेत. कोरेगाव शहरासह तालुक्‍यात कोणाची खासगी सावकाराकडून पिळवणूक होत असल्यास तात्काळ जिल्हा पोलीस प्रमुख कार्यालय, स्थानिक गुन्हे शाखेत संपर्क साधण्याचे आवाहन पोलीस दलाकडून करण्यात आले आहे.

दरम्यान, कोरेगाव शहरात गेल्या वर्षी सीसीटीव्हीचा प्रकल्प लोकसहभागातून करण्याचा निर्धार तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी प्रेरणा कट्टे यांनी केला होता. त्यांनी स्थानिक सेवाभावी संस्थेला बरोबर घेत पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांशी समन्वय साधून निधी जमा करण्यास सुरूवात केली होती. त्यावेळी दीपक फाळके याने स्वत: उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात जाऊन कट्टे यांना एक धनादेश प्रदान केला. त्याची छायाचित्रे काढून सोशल मिडियावर वेगळीच रक्कम टाकून व्हायरल केली. ही गोष्ट समजताच, कट्टे यांनी स्वत:हून सोशल मिडियावर खुलासा करत दीपक फाळके याने चुकीचा मेसेज व्हायरल केल्याचे नमूद केले होते. अर्थात फाळकेचा तो धनादेश वठला असेलच असे नाही.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.