सातारा (प्रतिनिधी) – मलकापूर ता. कराड येथील ४७ वर्षीय करोनाबाधिताचा मृत्यू झाला असून जिल्ह्यातील २३० जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. २७ जणांचे नमुने पाठविले तपासणीला पाठवले आहेत. जिल्ह्यात करोनमुळे आतापर्यंत १५ जणांचा म्रुत्यू झाला आहे. तर रुग्णसंख्या ४२२ झाली आहे.
पनवेल येथून प्रवास करुन आलेला मलकापूर (ता. कराड) येथे स्वत:च्या मालकीच्या घरात राहत असणारा (मूळ गाव बाचोली ता. पाटण) येथील ४७ वर्षीय पुरुषाला अस्वस्थ वाटत असल्याने २१ मे रोजी कृष्णा मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले होते.
तपासणीअंती हा करोनबाधित असल्याचा रिपोर्ट आला होता. या बाधित रुग्णाचा गुरुवारी पहाटे मृत्यू झाला आहे. या रुग्णाला सुरुवातीपासून उच्च रक्तदाबाचा त्रास होता, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
पुण्यातील एन.सी.सी.एस. यांनी १९१ तर कृष्णा मेडिकल कॉलेजने ३९ अशा एकूण २३० जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह असल्याचे कळविले आहे, असेही डॉ. गडीकर यांनी सांगितले.
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयातील २७ जणांच्या घशातील स्त्रवांचे नमुने एन.सी.सी.एस. यांच्याकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.
आतापर्यंत जिल्ह्यात ४२२ करोनाबाधित रुग्ण आढळले असून त्यापैकी १२६ रुग्ण बरे झाले आहेत. तर २८१ रुग्णांवर उपचार सुरु असून १५ जणांचा मृत्यू झालेला आहे.