कोरेगाव : विजयादशमीदिवशी कोरेगाव- जळगाव रस्त्यावर पाटील हॉस्पिटलच्या पाठीमागील बाजूस वॅगनआर कार अंगावर घालून जळगाव (ता. कोरेगाव) येथील निलेश शंकर जाधव याला जीवे मारण्याचा प्रयत्न झाला होता. त्यात त्याचा मृत्यू झाल्याने जळगावचे ग्रामस्थ आणि नातेवाइकांनी सातार्यात गोंधळ करुन संशयिताला अटक केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेऊन अंत्यसंस्कार न करण्याचा पवित्रा घेतला.
मात्र, पोलीस अधीक्षकांनी चर्चेतून मार्ग काढला आणि युवकावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. कोरेगाव पोलिसांनी गुन्ह्यात कट रचून खून केल्याचे कलम वाढविले असून, तीन जणांना संशयित केले आहे. त्यातील दोघांना अटक केली असून, त्यात एका महिलेचा समावेश आहे. एकाला सात दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आलली आहे.
दसर्याच्या दिवशी मारुती वॅगनआर कारने दुचाकीला धडक देऊन निलेश जाधव याला जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. त्यात गंभीर जखमी झालेल्या निलेश जाधव याचा सातारा येथील खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरु असताना मृत्यु झाला. सोमवारी सकाळपासून नातेवाइकांनी व जळगावच्या ग्रामस्थांनी जिल्हा रुग्णालयासमोर आणि पोलीस मुख्यालयासमोर गोंधळ घातला.
पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ व सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत हुले यांनी समजूत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, जमाव ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. कोणत्याही परिस्थितीत पोलीस अधीक्षक समीर शेख यांची भेट घेण्याचा तगादा त्यांनी लावला होता. मृतदेह ताब्यात घेऊन अंत्यसंस्कार करणार नाही, असा पवित्रा घेतल्यानंतर पोलीस अधीक्षक शेख यांनी ग्रामस्थ व नातेवाइकांशी चर्चा केली.
गुन्हा घडल्यापासूनचा घटनाक्रम शेख यांनी सांगितला. तपास योग्य दिशेने सुरु आहे, मुख्य संशयित विशाल शिंदे फरारी आहे. त्याचा शोध सुरु आहे. ४८ तासाच्या आत त्याला अटक केली जाईल, असे सांगितल्यानंतर जमाव शांत झाला. ग्रामस्थांच्या मागणीनुसार निलेश जाधव याच्या खून प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. तशी कलमे वाढविण्यात आली. विशाल याचा भाऊ संतोष शिंदे याला अटक करण्यात आली.
त्याला न्यायालयाने सात दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. त्यानंतर सायंकाळी संतोष शिंदे याच्या पत्नीला अटक करण्यात आली. तिला मंगळवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे. मुख्य संशयित विशाल शिंदे याच्या शोधार्थ पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी व कर्मचार्यांचे पथक रवाना करण्यात आले आहे. त्याचबरोबर सातारच्या स्थानिक गुन्हे शाखेने देखील समांतर तपास सुरु केला असून त्यांची पथके शोध घेत आहेत.