नवी दिल्ली : जगभरात या व्हायरसमुळे मृत्यू झालेल्यांची संख्या वाढू लागली आहे. आता त्यात जगातील पहिला राजघराण्यातील मृत्यू झाल्याचे उघड झाले आहे. यात स्पेनच्या राजघराण्यातील व्यक्तिचाही समावेश झाला आहे. स्पेनची राजकन्या मारिया तेरेसा यांचा करोना व्हायरसमुळे मृत्यू झाला. त्या ८६ वर्षांच्या होत्या. मारिया यांचे बंधु प्रिन्स सिक्सटो एनरिक दी बॉरबोन यांनी फेसबुकवरून ही माहिती दिली.
स्पेनचे राजे फिलिप (सहावे) यांना करोना झाल्याचा संशय होता. मात्र त्यांची चाचणी निगेटिव्ह आली होती. त्यानंतर राजकन्या मारिया तेरेसा यांना लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून उपचार सुरू होते. पण, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
मारिया ह्या राजकन्या तर होत्याच शिवाय त्या एक समाजशास्त्राच्या प्रोफेसरही होत्या. त्या धाडसी होत्या. त्यांची वक्तव्य थेट असायची. शिवाय त्या समाजकार्यात आघाडीवर असायच्या. त्यामुळे त्यांचं नाव रेड प्रिन्सेस असं प्रसिद्ध झालं होतं. २६ मार्च रोजी त्यांचा करोनामुळे मृत्यू झाला आणि शुक्रवारी त्यांच्यावर माद्रिद येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.