कोल्हापूर: भरधाव शिवशाही बसने मोटरसायकलला पाठीमागुन जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात मोटरसायकलवर पाठीमागे बसलेली एका बालिकेचा मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली. तर तिचे आई-वडील जखमी झाले आहेत. ही घटना पुणे-बंगळूरु राष्ट्रीय महामार्गावर शिरोळी इथ घडली.
समृद्धी विकास पाटील असे अपघातात मृत्यू झालेल्या 11 वर्षीय मुलगीचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, सांगली जिल्ह्यातील शिगांव इथले विकास हंबीराव पाटील हे आपल्या मोटरसायकलवरुन पत्नी कल्पना पाटील आणि 11 वर्षिय मुलगी समृद्धी विकास पाटील यांना घेवुन सांगलीच्या दिशेन येत होते. दरम्यान, पुणे-बंगळूरू या राष्ट्रीय महामार्गावरुन पुणेच्या दिशेने निघाले असताना शिरोळी इथल्या शबनम धाब्यासमोर कोल्हापुरहुन पुण्याच्या दिशेन निघालेल्या शिवशाहीने पाठीमागुन मोटरसायकलला जोराची धडक दिली.
यावेळी पाठीमागे बसलेली समृद्धी उडुन त्याच बसच्या चाकाखाली पडली. तिच्या अंगावरुन बसचे चाक गेल्याने ती जागीच ठार झाली. तर तिचे आई-वडील विकास पाटील आणि कल्पना पाटील हे जखमी झाले आहेत. या तिघांना सीपीआरमध्ये दाखल केले असता समृद्धी ही उपचारापुर्वीच मयत झाल्याचे डॉक्टरांनी घोषीत केले. या घटनेची नोंद शिरोळी एमआयडीसी पोलीस ठाण्यात झाली आहे.