शिरवळ – शिरवळ (ता. खंडाळा) येथील चौपाळा याठिकाणी एका विद्युत खांबावर काम करत असताना शॉक लागून खांबावरुन पडल्याने कंत्राटी वायरमनचा मृत्यू झाला. अक्षय बाळकृष्ण कदम (वय 24 रा. लोणी ता. खंडाळा) असे मृत्यू झालेल्या वायरमनचे नाव आहे.
अधिक माहिती अशी, शिरवळ (ता. खंडाळा) गावच्या हद्दीमध्ये चौपाळा याठिकाणी इंडस्ट्रीयल पोलवरील जंप तुटल्याने अक्षय कदम व कृष्णा सावंत हे दोघे वायरमन दुरुस्तीकरिता त्याठिकाणी गेले होते. दुरुस्तीचे काम करण्याकरिता अक्षय हा पोलवर चढला असता त्याठिकाणी अचानकपणे विद्युत प्रवाहचा झटका बसल्याने अक्षय कदम हा खाली पडून गंभीर जखमी झाला.
त्यामुळे घटनास्थळावरील उपस्थितांनी त्याला शिरवळ येथीलच एका खासगी रुग्णालयामध्ये दाखल केले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेची नोंद शिरवळ पोलीस ठाण्यात झाली असून अधिक तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पांडुरंग हजारे व बी. एन. भोईटे हे करीत आहे.