नगर – स्वास्तिक चौकातील बसस्थानकात किरकोळ वादातून झालेल्या हाणामारीत गंभीर जखमी झालेल्या युवकाचा उपचारादरम्यान आज सकाळी खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. त्यामुळे सदर गुन्ह्यात खुनाचे कलम वाढविण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. तब्बल महिनाभर जखमींवर उपचार सुरू होते.
किरण जगताप (रा. स्टेशन रोड, नगर) हे मयत झालेल्या युवकाचे नाव आहे. याबाबत पोलिसांकडून समजलेली माहिती अशी की, 29 एप्रिल रोजी रात्री स्वास्तिक चौकातील बसस्थानकात किरकोळ वादातून एका टोळक्याने जगताप यांना बेदम मारहाण केली होती. मारहाणीत जगताप हे गंभीर जखमी झाले होते. त्यावरून बागवान गटाविरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या किरण जगताप यांच्यावर महिनाभरापासून आनंदऋषी हॉस्पिटल येथे उपचार सुरू होते.
तब्बल महिनाभराच्या उपचारानंतर जगताप यांचा आज सकाळी मृत्यू झाला. जगताप यांच्या मृत्यूची माहिती मिळताच त्यांचे नातेवाईक व पोलिसांनी आनंदऋषी हॉस्पिटल येथे धाव घेतली. याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी सदर गुन्ह्यातील खुनाचे कलम वाढविले आहे. दुपारी जगताप यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा रूग्णालय येथे हलविण्यात आले. कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विकास वाघ यांनी त्याच्या नातेवाईकांना आरोपींना अटक करण्याचे आश्वासन दिले आहे.