मुंबई – देशभरात सध्या करोना प्रतिबंधक लसीचं लसीकरण जोरात सुरू आहे. दररोज हजारो लोकांना करोना प्रतिबंधक लस देण्यात येत आहे. सध्या देशातील ज्येष्ठ नागरिकांना प्राधान्य क्रमाने लस देण्यात येत आहे. मुंबईतही लसीकरण सुरू आहे. मात्र वसई विरार महापालिकेअंतर्गत असलेल्या नालासोपारा येथील आरोग्य केंद्रात दुर्दैवी घटना घडली. लसीकरणासाठी गेलेल्या ज्येष्ठ नागरिकांचा येथे मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.
लसीकरणासाठी पोहोचलेल्या एका ६३ वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला आहे. उन्हामुळं चक्कर येऊन पडल्याने मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. आरोग्य केंद्रात रुग्णवाहिका उपलब्ध नसल्यामुळे या ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाल्याचा आरोप येथील उपस्थितांनी केला आहे. त्यामुळे येथील आरोग्य सुविधेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.
नालासोपारा येथील पाटणकर परिसरात राहणारे हरीशभाई पांचाळ महापालिकेच्या आरोग्य केंद्रात लस घेण्यासाठी गेले होते. नावनोंदणी करण्यासाठी ते रांगेत उभे होते. त्याचवेळी त्यांना अचानक चक्कर आली. त्यामुळं ते खाली कोसळले. त्यांना जवळच्या पालिका रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.
दरम्यान मृत वृद्धला आधीच मधुमेहाचा त्रास होता. तसेच सर्व आरोग्य केंद्रावर रुग्णवाहिका आणि ऑक्सिजन सुविधा उपलब्ध आहेत. लस घेण्यापूर्वीच वृद्धाचा मृत्यू झाल्याचे पालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.