लातूर – लातूर येथे दालमिलमध्ये अडकून महिला मजुराचा मृत्यू झाला आहे. ही दुर्दैवी घटना शहरातल्या एमआयडीसीतील दालमिलमध्ये घडली. माया बाजूळगे असे मृत्यू झालेल्या महिलेचं नाव आहे.
दालमिल मशिनमध्ये दाळ ढकलत असताना माया ज्यावर बसल्या होत्या, तो पत्रा कोसळला. त्यामुळे माया बाजूळगे या मशिनमध्ये अडकल्या. मशिनमध्ये अडकल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर नातेवाईकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली.
या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या माया बाजूळगे यांना दोन मुले आहेत. त्यांचे पतीही मजुरी करतात. अपघात घडला त्या दालमिलमध्ये मजुरांच्या सुरक्षिततेसाठी कोणत्याही प्रकारची उपाययोजना नाही. शिवाय, मजुरांना विमा संरक्षणही नसल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. शोकाकुल वातावरणात माया बाजूळगे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पोलीस आता या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.