नगरमध्ये करोनाबाधित महिलेचा मृत्यू

नगर -नगर शहरातील रामचंद्र खुंट परिसरातील 67 वर्षीय महिलेचा आज सायंकाळी करोनामुळे मृत्यू झाला. तर कर्जत तालुक्‍यातील राशीनमध्ये क्‍वारंटाईन केलेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दरम्यान, नगर शहरात करोनाबाधित महिलेच्या मृत्यूमुळे करोना बाधित रुग्णांचा आकडा 69 वर गेला आहे.

नगर शहरातील रामचंद्र खुंट येथील या महिलेवर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्या रुग्णालयाने  या महिलेचा स्त्राव तपासणीसाठी खासगी मान्यता प्राप्त प्रयोगशाळेत पाठविले होते. त्यात तिचा अहवाल आज पॉझिटिव्ह आला. त्यामुळे जिल्ह्यात करोनाबाधित रुग्णांची संख्या 69 झाली आहे. करोनामुळे मृत्यू पावलेल्या व्यक्‍तींची संख्या 6 झाली आहे. दरम्यान या महिलेच्या संपर्कात आलेल्यांचे स्त्राव घेण्यात येत असून त्यांना क्‍वारंटाईन करण्यात आले आहे.

दरम्यान, मुंबई (वाशी) येथून राशीनला आपल्या मुलीकडे आलेल्या करोना संशयित वृध्द महिलेचा मृत्यू झाला आहे. या 60 वर्षीय महिलेस राशीनच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत क्‍वारंटाईन करण्यात आले होते. बुधवारी रात्री या महिलेस दमा, ताप तसेच घशाचा सुरू झाला. त्यावेळी तिला तात्काळ रुग्णवाहिकेमधून नगरला नेले जात होते. मात्र रस्त्यातच तिचा मृत्यू झाला. या महिलेस रक्तदाब व मणक्‍याचा त्रास होत असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. विलगीकरण कक्षात असताना ही महिला कोणाकोणाच्या संपर्कात आली होती, यावर प्रशासन आता काम करीत आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.