मंचर (प्रतिनिधी) –वळती (ता. आंबेगाव) येथे सुंबरजाई वस्तीत शेततळ्यात पडून बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू झाला. सोहम गणेश गरकळ (वय 10) असे बुडून मृत्यू झालेल्याचे नाव आहे. ही घटना सोमवारी (दि. 25) सकाळी 9 वाजता घडली.
वळती गावाच्या पूर्वेला तीन किलोमीटर अंतरावर सुंबरजाईवस्ती आहे. तेथे भगवान गंगाधर गिते या आजोबांकडे सोहम गणेश गरकळ, शुभम गणेश गरकळ ही मुले शिक्षणासाठी राहत होती. ते मूळचे बीड जिल्ह्यातील आहेत.
सोमवारी सकाळी ही मुले महादू नरहरी भोर यांच्या शेततळ्याजवळ खेळत होती. त्यावेळी सोहम शेततळ्यात पडल्याने बुडू लागल्याने शुभमने आरडाओरडा करून आजूबाजूच्या नागरिकांना बोलवले; परंतु तोपर्यंत सोहम बुडाला होता. स्थानिकांनी सोहमचा मृतदेह शेततळ्याच्या बाहेर काढला. त्यानंतर मंचर पोलीस ठाण्याचे सचिन देशमुख यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. पुढील तपास पोलीस नाईक ईश्वर कदम करीत आहेत.