तुरुंगात असलेल्या बांगलादेशी लेखकाचा मृत्यू

ढाका – बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना यांच्यावर करोनाच्या साथीदरम्यान गैरव्यवस्थापन आणि भ्रष्टाचाराचे आरोप केल्याबद्दल तुरुंगात असलेल्या मुश्‍ताक अहमद या लेखकाचा तुरुंगातच मृत्यू झाला आहे. अहमद यांच्यासह 11 जणांना सोशल मिडीयाच्या माध्यमातून बदनामी केल्याच्या आरोपाखाली गेल्या वर्षी तुरुंगात टाकण्यात आले होते.

कोविड-19 च्या साथीला नियंत्रणात आणण्याऐवजी पंतप्रधान शेख हसिना यांनी गैरव्यवस्थापनच केले असल्याची टीका मुश्‍ताक अहमद यांनी काही व्यंगचित्रांच्या माध्यमातून केली होती. त्यांनी पंतप्रधान हसिना यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोपही केले होते. या प्रकरणी अहमद यांच्यावर बांगलादेशातील 2018 सालच्या डिजीटल सिक्‍युरिटी ऍक्‍टखाली खटला चालवला गेला. या कायद्याद्वारे ऐक्‍य, आर्थिक व्यवहार, सुरक्षा, संरक्षण, धार्मिक मूल्ये किंवा देशातील सार्वजनिक शिस्त यांचे उल्लंघन करणाऱ्या कोणावरही दंड आणि अटक करण्यास सरकारला व्यापक अधिकार प्राप्त होतात. विरोधकांना दडपण्यासाठी या कायद्याचा व्यापक प्रमाणात गैरवापर होत असल्याची टीका विरोधकांनी केली आहे.

मुश्‍ताक अहमद आणि अन्य 11 जण जवळपास वर्षभर तुरुंगात होते. त्यांना काशीमपूर तुरुंगात ठेवले गेले होते आणि त्यांना 6 वेळा जामीनही मंजूर झाला नव्हता. गुरुवारी अहमद यांची शुद्ध हरपली आणि त्यांना तुरूंगातील रुग्णालयात नेण्यात आले. कारागृह रक्षकांनी नंतर त्यांना जवळच्या गाझीपूर येथील मोठ्या वैद्यकीय सेवालयात नेले, पण तिथे आल्यावर त्याला मृत घोषित करण्यात आले, मुश्‍ताक अहमद यांच्या मृत्यूची चौकशी करण्यात यावी आणि डिजीटल सिक्‍युरिटी ऍक्‍ट रद्द करण्यात यावा, अशी मागणी बांगलादेशातील विरोधकांकडून करण्यात येऊ लागली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.