इंदापूर तालुक्‍यात लाळ खुरकत रोगाचे थैमान; दिवसात बारा जनावरांचा मृत्यू

वडापुरी  – इंदापूर तालुक्‍यातील बहुतांश गावांत लाळ खुरकत रोगाने थैमान घातले आहे. त्यामुळे तालुक्‍यातील शेतकरी पुरता हैराण झाला आहे. या रोगामुळे डाळज नं. 3 मधील गणेश जगताप यांच्या गोट्यातील बारा जणांचा दिवसात मृत्यू झाला आहे. यामुळे तालुक्‍यातील दूध उत्पादक शेतकरी धास्तावले आहेत.

इंदापूर तालुक्‍यातील वालचंदनगर, लासुर्णे, नीरा नरसिंहपूर आदी गावांसह नीरा आणि भीमा नद्यांच्या पट्ट्यातील जनावरे लाळ खुरकत आजाराने दगावत आहेत. पाळीव व दुधाची जनावरे दगावल्याने येथील शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे.

तालुक्‍यात बहुतांश शेतकरी शेतीबरोबर दूध व शेळीपालनाचा व्यवसाय करीत आहेत. त्यामुळे तालुक्‍यात पाळीव दुधाळ जनावरांची संख्या मोठी आहे. मात्र आता लाळ खुरकत आजारामुळे जनावरे दगावल्यावर डोळ्यांदेखत त्यास जेसीबीने खड्ड्यात गाडावे लागत असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.

नरसिंहपूर परिसतील गणेशवाडी, गिरवी, टणू, पिंपरी बुद्रुक, ओझरे, गोंदी, लुमेवाडी गावातील शेळ्या, गावरान व जर्शी गाई, म्हैसींना लाळ्या खुरकूत रोगाची लागण झाली आहे. इंदापूर तालुक्‍याच्या पूर्व भागामध्ये आतापर्यंत 15 पेक्षा जास्त जनावरांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात इंदापूर तालुका हा दुग्ध उत्पादनात आघाडीवर आहे. त्यामुळे हे संकट टाळण्यासाठी इंदापुरातील पशुसंवर्धन प्रशासन कामाला लागले आहे. त्यामुळे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे याबाबत काय ठोस उपाय योजना करणार याकडे तालुक्‍यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

“जिल्हा पशू संवर्धन उपआयुक्‍त यांच्यामार्फत इंदापूर तालुक्‍यासाठी दि. 18 सप्टेंबर रोजी एक लाख 58 हजार लाळ खुरकत प्रतिबंधक लसीची मात्रा प्राप्त झाली आहे. दि. 19 सप्टेंबर पासून संपूर्ण तालुक्‍यात या लसीचे वाटप केले आहे. तालुक्‍यात जिल्हा परिषदेच्या 27 संस्था आणि राज्य शासनाची एक अशा एकूण 28 संस्थामार्फत संपूर्ण तालुक्‍यात लसीकरण मोहीम सुरू केली आहे.”
– डॉ. राम शिंदे, पशुधन विकास अधिकारी इंदापूर

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.