मृत्युंजय गॉसिन पितामह

ही अद्‌भुत घटना मे 2009च्या अखेरच्या सुमारास घडली. मला ऑस्ट्रिया देशातील एका परिसंवादामध्ये तांत्रिक विषयावरील अभिभाषणासाठी निमंत्रित करण्यात आलं होतं. निमंत्रक कंपनी प्लॅस्टिक वस्तू बनवण्यासाठी लागणाऱ्या यंत्रसामग्रीची जगातील सर्वात मोठी उत्पादक म्हणून ओळखली जाते. हा परिसंवाद लिंझ शहराजवळ होता आणि माझा येण्या-जाण्याचा तसंच राहण्याचा खर्चही त्या कंपनीनंच उचलला होता. मी त्यांचा 3-4 दिवस पाहुणा होतो. निघण्यापूर्वी त्या कंपनीनं मला तुम्हाला जवळपासची काही ठिकाणं पाहण्याची इच्छा असेल तर तसे कळवावे असं विचारलं होतं. त्यानुसार मी जवळील माउथहाउसेनमधील छळछावणी स्मारकाला भेट देण्याची इच्छा व्यक्त केली. कंपनीनं नाखुशीनं का होईना पण माझी मागणी मान्य केली. याचं कारण म्हणजे जर्मनी आणि ऑस्ट्रिया इथल्या लोकांना काळ्या नाझी इतिहासाच्या आठवणी नको असतात.

त्या दिवशी काहीतरी सबब सांगून कंपनीनं माझ्यासोबत त्यांचा माणूस दिला नाही. ड्रायव्हरनं मला माउथहाउसेनच्या गेटपाशी सोडलं. तो नंतर ठरलेल्या वेळी मला घेण्याकरता पुन्हा तिथं येणार होता. त्या भयानक छळछावणीतील दुसऱ्या महायुद्धकाळातील नरकसदृश वातावरण निर्माण केलं असल्यानं अंगावर काटा आणणारी सामग्री आणि पद्धती पाहून माझ्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. नाझी अधिकारी बहुतांश ज्यू युद्धकैद्यांच्या डोक्‍यातील उवा नष्ट करण्याच्या निमित्तानं गॅस चेंबरमध्ये नेऊन पाण्याच्या फवाऱ्यात प्रुसिक ऍसिड सोडीत. तयार झालेल्या सायनोजेन विषारी वायूमुळं सगळे कैदी तात्काळ मृत्युमुखी पडत. पन्नास किलो वजनाचे अवजड दगड वाहायला लावून कैद्यांना नंतर कड्यावरून ढकलून देत. त्यांची हवाई छत्रीशिवाय उडी घेणारे सैनिक अशी छद्मी संभावना करून त्यांच्या कलेवरांवर नाचणाऱ्या नाझी असुरांच्या क्रोर्याची कल्पनाही येणार नाही. स्मारक पाहून झाल्यावर तेथील उद्यानात मी काही काळ बसलो. तिथं अनेक राष्ट्रांनी त्यांच्या देशातील हौतात्म्य पत्करलेल्या कैद्यांची सुरेख शिल्परूपी स्मारकं उभारली आहेत.

स्मारक बंद होणार असल्यानं मी गेटच्या आत ड्रायव्हरची वाट पाहत असताना एक तरुण मुलगा एका वृद्ध गृहस्थांना घेऊन आत आला. मोडक्‍या-तोडक्‍या इंग्रजीत आमचं संभाषण सुरू झालं. आणि मला धक्काच बसला. ते वृद्ध गृहस्थ स्वत: त्या छळछावणीत युद्धकैदी होते! त्यांची कहाणी ऐकून माझ्या डोळ्यांतून पुन्हा अश्रुसिंचन सुरू झालं.
जॉर्ज गॉसिन हे त्या ज्यू गृहस्थांचं नाव. ते पॅरिसमध्ये राहतात. ते जेव्हा 1942-43च्या सुमारास नाझींच्या हाती सापडले तेव्हापासून डझनावारी वेळा त्यांनी मृत्यूला चकवलं आहे. पहिल्यांदा अगदी तरुण वयात (साधारणपणे 18-19) पकडून त्यांना आउशवित्झ (पोलंड) इथल्या छळछावणीत धाडण्यात आलं. तिथं कैद्यांची संख्या खूप झाल्यानं त्यांना गुरं वाहून नेणाऱ्या मालगाडीत इतर अनेक कैद्यांसह अक्षरश: कोंबून माउथहाउसेन इथल्या छळछावणीत पाठवण्यात आलं. श्‍वास घेणंही मुश्‍कील होईल अशा बंद डब्यांत अनेक कैदी मृत्युमुखी पडले आणि फारच थोडे वाचले. त्यामध्ये गॉसिन होते.
माउथहाउसेनला कैद्यांचा प्रचंड छळ करण्यात आला. वेळोवेळी अंगावर अतिशीत पाणी ओतणे, बर्फात कुडकुडण्यासाठी फेकून देणे, अतिशय जड दगड उचलून वाहावयास लावणे इ. यातना भोगावयास लावल्या जात होत्या. त्यातूनही वाचल्यास गॅस चेंबरमध्ये कोंडून काही क्षणातच यमसदनाला पाठवण्याची योजनाही होती.
रोजच्या रोज हजारोंनी मरणाऱ्या कैद्यांच्या कलेवरांचा कच्चा माल वापरून त्यांच्या केसांपासून ब्लॅंकेट्‌स, हाडांपासून फॉस्फरस व इतर रसायनं बनवणं अशा प्रकारचे अंगावर शहारे आणतील अशा उद्योगांचीही योजना होती.
मात्र आउशवित्झ आणि माउथहाउसेन इथल्या यातनांना तोंड देऊन, मालगाडीतील गुदमरवणाऱ्या आणि तहान-भुकेनं कासावीस करणाऱ्या प्रवासातून गॉसिन यांनी आपल्या अतुलनीय धैर्यानं आणि दुर्दम्य इच्छाशक्तीनं यमराजाला माघारी धाडलं.

अखेर एप्रिल 1945मध्ये दोस्त राष्ट्रांनी जर्मन साम्राज्यावर हल्ला चढवला. त्यांची सेना माउथहाउसेनजवळ आल्याचं वृत्त हाती येताच छळछावणी अधिकाऱ्यांनी मी जिथं थांबलो होतो त्याच मोठ्या चौकात सर्व कैद्यांना सभेसाठी बोलावलं आणि कुठलीही कल्पना न देता बंदुकीच्या गोळ्यांचा वर्षाव करून ठार मारलं. या गोळ्यांच्या वृष्टीत बहुतेक सर्व ठार झाले पण गॉसिन नशिबानं वाचले आणि मेल्याचं सोंग करून पडून राहिले कारण कुणी वाचलं आहे का हे ते अधिकारी शरीराला डिवचून पाहत होते आणि जिवंत आढळल्यावर पुन्हा गोळ्या घालून ठार मारत होते.
अखेर नाझी अधिकारी दोस्त राष्ट्रांच्या सेनेपासून स्वत:चा जीव वाचवण्यासाठी पळून गेले. दोस्त सेनेनं गॉसिनना रुग्णालयात दाखल करून बरे होताच पॅरिसला घरी पाठवून दिलं.

असे मृत्यूला पराभूत करणारे गॉसिन आजोबा नशीबवान तर खरेच पण या गॉसिनना 64 वर्षांनंतर प्रथमच त्या भयानक भूमीला भेट देण्याची इच्छा व्हावी आणि नेमक्‍या त्याच वेळेला माझी त्यांची भेट व्हावी हा दैवी योगच नाही का?
2009मध्ये जॉर्ज गॉसिन 85-86 वर्षांचे होते. गॉसिन इतके खंबीर आहेत की तेव्हाही ते आपला इस्टेट व्यवसाय करीत होते. काही वर्षांपूर्वी त्यांच्या बंधूंमार्फत त्यांनी खुशालीही कळवली. त्यांनी त्यांच्या घरी मला कधीही पाहुणा म्हणून येण्यासाठी निमंत्रित केलं आहे. त्यांच्या मनात आज त्यांना यातना देणाऱ्यांबद्दल यत्किंचितही क्रोध नाही. भारताबद्दल त्यांचं खूप चांगलं मत आहे. 2008 साली झालेल्या मुंबई हल्ल्यात ज्यूंना लक्ष्य केलेलं त्यांना माहीत होतं. त्यांनी मला सांगितलं, ज्यूंसाठी जगात केवळ दोनच देश पूर्णपणे सुरक्षित आहेत-एक म्हणजे इस्राइल आणि दुसरा भारत!

श्रीनिवास शारंगपाणी

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here