पुणे – नववर्षाच्या रात्री मद्यपान करणे एकाच्या जीवावर बेतले. मद्याच्या नशेत घराजवळ रस्याच्या चढणावर पडल्याने मृत्यू झाला. याप्रकरणी सहकारनगर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
बापू शिवाजी भोसले (45,रा.धनकवडी) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार बापू हा रोजंदारीवर काम करतो. त्याला मद्याचे व्यसन असल्याचे त्याच्या नातेवाईकांनी सांगितले. 31 डिसेंबरच्या रात्री तो मद्यपान करण्यासाठी बाहेर पडला होता.
मद्यपान करुन घरी परतत असतानाच घराजवळ रस्त्यातच तो पडला. त्याच्या नातेवाईकांनी त्याला उठवण्याचा प्रयत्न केला, मात्र तो निपचीत पडला होता. दरम्यान याची खबर पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी बापूला रुग्णालयात दाखल केले असता, डॉक्टरांनी वैद्यकीय तपासणीअंती त्यास मृत घोषीत केले. याप्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक कदम करत आहेत.
मोहननगर परिसरात असलेल्या अवैद्य देशी दारू मुळे अनेकांचे संसार उद्वस्त झाले असून कित्येकांचे बळी गेले आहेत. तरीही राज्य उत्पादन शुल्क विभाग यावर कारवाई करत नाही त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला. अजून किती बळी गेल्यावर प्रशासन कारवाई करणार असा उदिग्न सवाल पतित पावन संघटनेचे विजय क्षिरसागर यांनी केला.