नवी दिल्ली : जगभरात करोनाने पुन्हा एकदा हातपाय पसरण्यास सुरुवात केली आहे. त्यात चीन, जपान, अमेरिका आणि दक्षिण कोरियासह अनेक देशांचा सहभाग आहे. अशातच आता करोना संदर्भात आणखी एक धक्कादायक अहवाल समोर आला आहे. करोना संसर्गातून बरे झाल्यानंतर 18 महिन्यानंतर या विषाणूमुळे तुमचा मृत्यू होऊ शकतो, अशी माहिती समोर आली आहे. शास्त्रज्ञांनी नव्या अहवालाच्या आधारे हा दावा केल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
शास्त्रज्ञांनी नव्या अहवालानुसार दावा करत, करोना महामारीदरम्यान अनेक प्रकरणं समोर आली आहेत ज्यामध्ये करोनाला संसर्गावर मात केल्यानंतर काही दिवसांनी लोकांचा मृत्यू झाला. युरोपियन सोसायटी ऑफ कार्डिओलॉजीच्या जर्नलमध्ये हृदय आणि रक्तवाहिन्यासंबंधी नवीन अहवाल प्रकाशित झाला आहे. या संशोधनानुसार, करोनाबाधित रुग्णांमध्ये हृदयाशी संबंधित आजारांची अधिक लक्षणे आढळून आलीत, ज्यामुळे त्यांचा मृत्यू होऊ शकतो. 1,60,000 लोकांवर संशोधन करुन हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे.
चीनच्या हाँग विद्यापीठाचे प्रोफेसर इयान सीके वोंग यांनी सांगितले की, “संशोधनाच्या निष्कर्षांवरुन असे दिसून येते की कोविड-19 चे रुग्ण या संसर्गातून बरे झाल्यानंतर किमान एक वर्ष त्यांचे निरीक्षण करणे गेले पाहिजे.” या अहवालानुसार, कोरोना संसर्ग न झालेल्या लोकांपेक्षा कोरोनाची लागण झालेल्या लोकांमध्ये संसर्गातून बरे झाल्यावर पहिल्या तीन आठवड्यांत हृदयविकाराने मृत्यूची शक्यता 81 पटीने जास्त होती. तसेच कोरोनातून बरे झाल्यानंतर 18 महिन्यांनंतर मृत्यूची शक्यता पाच पटीने जास्त होती.
अहवालानुसार, कोरोना रूग्णांना गंभीर हृदयविकार होण्याची शक्यता जवळजवळ चार पट जास्त होती. असंक्रमित रुग्णांपेक्षा संक्रमित गटामध्ये हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता 40 टक्क्यांनी जास्त होती. कोविड-19 च्या रुग्णांमध्ये गंभीर हृदयविकार होण्याची किंवा मृत्यू होण्याची शक्यता जास्त असते.