स्मिता पाटीलच्या आठवणी आजही ताज्याच…

निधनाला झाली 34 वर्षे; तरिही जादू कायमच

– श्रीनिवास वारुंजीकर
स्मिता पाटील. एक अत्यंत साधीभोळी, मध्यमवर्गीय घरातली, खानदेशाच्या ग्रामीण भागातून आलेली. वर्णाने सावळीच पण प्रचंड बोलके डोळे, आवाजावर हुकूमत आणि अंगप्रत्यंगातून व्यक्त होणारा अभिनय या जोरावर स्मिताने हिंदी सिनेसृष्टीसह मराठी सिनेमा आणि दूरदर्शन निवेदिका या क्षेत्रात आपला ठसा उमटवला. साधारण 34 वर्षांपूर्वी मुलगा प्रतीकच्या जन्मावेळीच परलोकीच्या प्रवासाला निघून गेलेली स्मिता आजही सिनेरसिकांच्या स्मरणात आहे.

शिवाजीराव आणि विद्याताई पाटील यांची कन्या असलेल्या स्मिताचा जन्म धुळे जिल्ह्यातल्या शिरपूर तालुक्‍यात झालेला. मग तिचे शालेय शिक्षण पुण्याच्या रेणुकास्वरुप शाळेत झाले.  साधारणपणे सत्तरच्या दशकात स्मिता मुंबई दूरदर्शनवर (सह्याद्री नव्हे) बातम्या सांगणारी निवेदिका या स्वरुपात सर्वप्रथम कॅमेऱ्याला सामोरी गेली. मग विख्यात दिग्दर्शक श्‍याम बेनेगल यांच्या विनंतीवरुन तिने सिनेसृष्टीत पदार्पण केले. सत्तरच्या दशकात आलेल्या समांतर सिनेमाच्या चळवळीत स्मिताने मोठे तोगदान दिलेच; शिवाय व्यावसायिक सिनेमांतही तिला लोकांनी भरपूर पाठिंबा दिला.

सत्यजित रे, श्‍याम बेनेगल, गोविंद निहलानी , मृणाल सेन आणि जी. अरविंदन यांच्यासारख्या दिग्गज दिग्दर्शकांच्या विविध सिनेमांत स्मिताने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवलाच. शिवाय मराठीमध्येही डॉ. जब्बार पटेल याण्च्यासारख्या दिग्गज दिग्दर्शकासमवेत तिने “उंबरठा’, “सामना’ आणि “जैत रे जैत’सारखे हिट सिनेमे केले. हिंदीमध्ये स्मिताने “निशात’, “मंथन’, “मिर्च मसाला’, “चक्र’, “अर्धसत्य’, “आखिर क्‍यों’, “गमन’, “आक्रोश’, “अर्थ’ “भिगी पलकें’, “मंडी’ आणि “गिध’ असे आव्हानात्मक भूमिका असलेले सिनेमे केले.

स्मिताने बॉक्‍स ऑफिस हिट्‌सही अनेक सिनेमे दिले. त्यामध्ये “नमक हलाल’, “शक्ती’, “गुलामी’, “कसम पैदा करनेवाले की’ आणि “घुंगरू’ अशा सिनेमांचा समावेश आहे. मराठीमध्ये तिच्या “सर्वसाक्षी’ या सिनेमालाही मोठी लोकप्रियता मिळाली होती.

वर्ष 1985 मध्ये पद्मश्री पुरस्कारावर नाव कोरणाऱ्या स्मिताला “भूमिका’ आणि “चक्र’मधील भूमिकांसाठी अभिनयाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. तर “चक्र’साठी तिला फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला. तिच्या “उंबरठा’ आणि “जैत रे जैत’मधील भूमिकांसाठी तिला मराठी फिल्मफेअरही मिळाला होता. तर प्रतिष्ठेच्या कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात स्मिता पाटील आणि शबाना आझमी यांच्या भूमिका असलेला “निशात’ हा सिनेमा सर्वोत्कृष्ट सिनेमाच्या श्रेणीसाठी नॉमिनेट झाला होता.

वयाच्या अवघ्या 31 व्या वर्षी हे जग सोडून गेलेल्या स्मिता पाटीलच्या आठवणी आजही सिनेरसिकांना व्याकूळ करतात. 34 व्या स्मृतिदिनानिमित्त स्मिता पाटीलला भावपूर्ण श्रद्धांजली…
– श्रीनिवास वारुंजीकर

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.