पुणे, {प्रभात वृत्तसेवा}- राज्यभरात चर्चेत असलेल्या लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळण्याची प्रतीक्षा आता संपली आहे. या योजनेचा लाभ दि.17 ऑगस्टपासून मिळणार आहे. जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांचे मिळून तीन हजार रुपये महिलांच्या बॅंक खात्यामध्ये जमा केले जाणार आहे. या योजनेचा लाभ हस्तांतरणाचा कार्यक्रम बालेवाडी येथे होणार आहे.
या कार्यक्रमाच्या पूर्वतयारीचा महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी येथे आढावा घेतला. राज्यात एकूण १ कोटी ४२ लाख महिलांनी या योजनेसाठी नोंदणी केली आहे. प्रत्येक जिल्ह्यात किमान ३ लाख महिलांनी नोंदणी केली आहे. राज्यात सर्वाधिक नोंदणी पुणे जिल्ह्यात झाली असल्याची माहिती तटकरे यांनी दिली.
यावेळी महिला व बालविकास आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे, पुणे मनपा आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त शेखर सिंह, जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे, एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्त कैलास पगारे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील,
अतिरिक्त पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा, उपायुक्त वर्षा लड्डा-उंटवाल, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी मोनिका रंधवे, आदी उपस्थित होते.
मंत्री तटकरे म्हणाल्या, योजनेचा लाभ हस्तांतर करण्यासाठी महिलांचे बँकखाते आधार संलग्न असल्याची खात्री करा.
पावसाची शक्यता लक्षात घेऊन कार्यक्रमाचे नियोजन करा, लाभार्थींसाठी छोटेखानी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन, बैठक व्यवस्था, पार्किंग, स्वच्छतागृहाची व्यवस्था आदी व्यवस्था करण्याच्या सूचना देऊन नोंदणीसाठी काम करणाऱ्या आशासेविका, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका अशा सर्वच घटकांचा कार्यक्रमात समावेश करा, असे त्यांनी सांगितले.