जामखेड, (प्रतिनिधी) – राज्य शासनाने जाहीर केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभासाठी आवश्यक कागदपत्रे काढण्याकरिता नागरिकांनी तलाठी कार्यालय, सेतू सुविधा केंद्र, तहसील कार्यालयात गर्दीच गर्दी केली होती. त्यामुळे या केंद्रांना यात्रेचे स्वरुप आल्याचे पहावयास मिळाले. दरम्यान, कागदपत्रे जमवाजमव करताना लाडक्या बहिणींची कसरत होताना दिसत आहे
महिलांचे आरोग्य, पोषण व आर्थिक स्वावलंबनासाठी राज्य शासनाच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यावर मासिक दीड हजार रुपये जमा हाेणार आहेत.
लाभासाठी आधारकार्ड, रहिवासी प्रमाणपत्र अथवा जन्म दाखला, वार्षिक अडीच लाखापर्यंतचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र, बँक खात्याच्या पासबुकाच्या पहिल्या पानाची झेरॉक्स, पासपोर्ट फोटो, रेशन कार्ड ही कागदपत्रे बंधनकारक आहेत. अर्ज दाखल करण्यासाठी नागरिकांची धावपळ सुरु होती.
लाभासाठी तहसील कार्यालयाचे उत्पन्नाचे आणि रहिवासी प्रमाणपत्र अत्यावश्यक आहे. या प्रमाणपत्रांसाठी किमान एक ते चार दिवस लागतात. त्यामुळे ती लवकरात लवकर मिळावी म्हणून आवश्यक कागदपत्रे काढण्याकरिता आणि ऑनलाईन प्रस्ताव दाखल करण्यासाठी नागरिकांची तलाठी कार्यालय, महा- ई- सेवा केंद्र, आपले सरकार केंद्रावर गर्दी झाल्याचे पहावयास मिळाले.
योजनेच्या अर्जाचा नमुना सोमवारी सायंकाळपर्यंत उपलब्ध झाला नव्हता. परिणामी, कोणकोणती व कशी माहिती भरावी लागेल, याबाबत अधिकारी व कर्मचारी अनभिज्ञ होते. दरम्यान, सेतू सुविधा केंद्र चालक अजून ऑनलाईन अर्ज उपलब्ध झाला नसल्याचे सांगत होते.