मंदीत गटांगळया की मुकाबला? (भाग-१)

बरोब्बर २१ वर्षांपूर्वी म्हणजे ५ ऑक्टोबर १९९८ रोजी मी माझ्या आयुष्यातील पहिला जॉब सुरु केला, जो योगायोगाने पुणे स्टॉक एक्स्चेंजमध्येच होता. तेंव्हा मिळणारे अडीच हजार देखील खूप कांही देऊन जायचे. मागील २१ वर्षांत अनेक गोष्टी व त्याप्रमाणं त्यामागील गणितं बदलली परंतु बचत व गुंतवणूक हा मूळ उद्देश मात्र अजूनही तसाच आहे. त्यासाठीची साधनं मात्र बदलली. १९९८ ते २००३ ही वर्षं रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी सुगीची वर्षं होती तर २००३ ते साधारणपणे २००७ ही पाच वर्षं इक्विटी मार्केटची होती तर २००७ ते २०१२ ही वर्षं सोनं-चांदी गुंतवणुकीसाठी सुवर्णयुग होती. पुन्हा २०१४ ते २०१९ ही वर्षं शेअर बाजारासाठी खासकरून म्युच्युअल फंड्ससाठी पूरक होती. असो, मूळ मुद्दा काय तर उत्तम भविष्यासाठी किंवा संपत्ती निर्मितीसाठी योग्यप्रकारे गुंतवणूक करणं.

प्रत्येक व्यक्तीस आपलं जीवन हे चांगल्याच प्रकारे जगता यावं ही अपेक्षा असते व आपल्यापेक्षाही आपल्या पाल्याचं जीवन अधिक समृद्ध असावं, यासाठी आपली धडपड असते. त्यासाठी कांही गोष्टीत तडजोड करणं हे क्रमप्राप्त ठरतं. त्यासाठी बचत व योग्यप्रकारे गुंतवणूक या गोष्टी महत्त्वाच्या ठरतात. आता आपणांस एक वर्ग असा आढळतो की ज्यांना पैसे कोठे व कसा खर्च करावा हा देखील प्रश्न असतो आणि म्हणूनच आठवड्याच्या शेवटास शहरातील प्रत्येक लाऊंज हा ओव्हरफ्लो होताना आढळतो. तर दुसऱ्या बाजूस एक वर्ग असा देखील आहे की जो रोजच्या मिळकतीवर आपली चूल मांडताना आढळतो, ज्यांना ‘दारिद्र्य रेषेखालील’ असं संबोधलं जातं, त्यांच्यासाठी कसचं आलंय आर्थिक नियोजन व वेल्थ क्रिएशन. परंतु जर आपण मध्यमवर्ग गृहीत धरला तरी भारतात ती संख्या आता लक्षणीय आहे. आता ढोबळमानानं या मिडलक्लासची व्याख्या कशी करता येईल? तर ज्या कुटुंबास कोणत्याही गोष्टीसाठी बजेटींग करावं लागतं ते म्हणजे मिडल क्लास कुटुंब. आता अनेकवेळा महिन्याच्या वाढीव खर्चांमुळं प्रत्येक कुटुंबप्रमुखाची कुठं ना कुठं ओढाताण होतंच असते आणि त्यामुळं बव्हतांशी चाकरमान्यांचं बचतीचं सूत्र काही जुळून येत नाही आणि त्यामुळं बचत नाही तर गुंतवणूक नाही आणि म्हणून आर्थिक नियोजन देखील नाही. आता यावर मार्ग काय ?

– सर्वप्रथम म्हणजे, ‘सर सलामत तो पगडी पचास’ या उक्तीप्रमाणं स्वतःच्या उत्पन्नाचा स्रोत बळकट करा, पक्का करा. ज्याप्रमाणं आपल्याला मिळालेल्या बढतीचं आर्थिक श्रेय आणि लाभ आपण कोणासही द्यावयास तयार होत नाही, त्याचप्रमाणं आर्थिक मंदीच्या काळात नोकरकपात अपरिहार्य असते आणि त्यासाठी आपण कोणांस दोषीदेखील ठरवू शकत नाही. आणि म्हणूनच आपली नोकरी काही करून टिकवा. सुसरबाई तुझीच पाठ मऊ ! संस्थेमधील आपली विश्वासार्हता, कामाचा आवाका वाढवा. वेळ पडल्यास आवाक्याबाहेरील कामं देखील जबाबदारीनं स्वयंस्फूर्तपणे स्वीकारा. तुमच्या कंपनीतील एक जबाबदार व्यक्तिमत्व बना.

– इतकं करूनही नोकरी गेल्यास स्वतःला समजवा व त्यासाठी स्वतःला तयार करा. कमीतकमी तुमच्या मासिक पगाराच्या सहा पट रक्कम हाताशी (LIQUID ASSET) ठेवा.

– उत्पन्न वाढवणं शक्य नसल्यास खर्च कमी करा.

– वर्तणुकीशी संबंधित जीवनशैली बदलणं हे सर्वात अवघड असतं. उदा. शून्य टक्के व्याजाचे ईएमआय आपल्याला लोभात पाडू शकतील परंतु अगदीच क्रमप्राप्त वस्तूच त्या पद्धतीने घ्या. अन्यथा तुम्ही गरज नसताना ईएमआयच्या मोहात पडून ती घेता असं समजा आणि असा व्यवहार आर्थिक नुकसानीचा ठरतो

मंदीत गटांगळया की मुकाबला? (भाग-२)

– असं म्हटलं जातं, की बचतीचा उत्पन्नाशी फारसा संबंध नसतो तर त्या व्यक्तीच्या इच्छेशी असतो.जॉर्ज एस क्लेसन यांनी ‘रिचेस्ट मॅन इन बॅबीलॉन’ या आपल्या पुस्तकात म्हटलंय, ‘paying yourself first’ म्हणजे दरमहा चुकतंहोणारंपहिलं बिल हे स्वतःचं असावं कारण त्यासाठी आपणच काम केलेलं आहे आणि म्हणून त्यास सर्वात जास्त लायक आपणच आहोत. त्यामुळं मासिक बिलं भरण्यापूर्वी, किराणा सामान खरेदी करण्यापूर्वी,  किंवाइतर काहीही करण्यापूर्वी, तुमच्या स्वतःसाठी आपल्या वेतनाचा काही भाग (बचत) म्हणून किंवा उत्पन्नाचा एक भाग म्हणून बाजूला ठेवा (कमीतकमी ४०%). यासाठीचा एक उत्तम मार्ग म्हणजे अशी रक्कम आपल्या सॅलरी अकाउंटमधून ऑटोडेबिट करणं.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)