पुणे : स्वयंपाक करण्याच्या बहाण्याने घरी बोलावून मूकबधिर तरूणीवर बलात्कार केल्याच्या आरोपातून तब्बल दहा वर्षानंतर मूकबधिर तरूणाची सत्र न्यायाधीश ए.व्ही.रोट्टे यांनी निर्दोष मुक्तता केली. घटना घडल्यानंतर एक वर्षाहून अधिक विलंबाने फिर्याद दिल्याच्या मुद्यावर न्यायालयाने हा निकाल दिला. विशेष म्हणजे दोघेही मूकबधिर असल्याने न्यायालयाला कामकाज करणे अवघड होते. या पार्श्वभूमीवर मूकबधिराची भाषा समजत असलेल्या मध्यस्थाच्या माध्यमातून न्यायालयाने दोघांचे म्हणणे जाणून घेतले.
20 वर्षीय मुलीने दिलेल्या फिर्यादीनुसार, 30 वर्षीय व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपीच्या वतीने न्यायालयात ऍड. गणेश भूमकर यांनी बाजू मांडली. त्यांना ऍड. योगेश बाविकर, ऍड. मिलिंद डोंबे आणि ऍड. बंटी गायकवाड यांनी सहकार्य केले. खोटी केस आहे. 8 वेळा बलात्कार केल्याचे पीडितेने म्हटले आहे. मात्र, हा प्रकार कोठे घडला, हे तिला सांगता आले नाही. घटना घडल्यानंतर एक वर्षाहून अधिक काळाने तिने फिर्याद दिली आहे. त्यामुळे त्याला सोडण्यात यावे, असा ऍड. गणेश भूमकर यांनी केलेला युक्तीवाद न्यायालयाने ग्राह्य धरला.
मूकबधिर उपक्रमाच्या कार्यक्रमात तिची आणि त्याची ओळख झाली होती. त्यानंतर त्याची पत्नीही तिची मैत्रिण झाली. 15 जानेवारी 2009 रोजी बायको गावी गेली आहे. स्वयंपाक करण्याच्या बहाण्याने बोलवून त्याने तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर वारंवार बलात्कार केल्याची तिने 15 जानेवारी 2010 रोजी भोसरी पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. तिचे शिक्षण दहावीपर्यंत झाले आहे. पोलिसात जाणे तिला शक्य नव्हते. तरीही ओळखिच्या आणि प्रिय व्यक्तीशी घडलेला प्रकार तिला सांगता आला असता. मात्र, तिने तसे केले नसून, उलट विलंबाने फिर्याद दिल्याचा निष्कर्ष काढत न्यायालयाने हा आदेश दिला.