पुणे – महावितरणच्या घरगुती, वाणिज्यिकसह इतर सर्वच वर्गवारीतील वीजग्राहकांना मार्च व एप्रिल महिन्यांचे वीजबिल भरण्यासाठी मुदतवाढ देण्याचे आदेश राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी महावितरणला दिले आहेत.
सोबतच महावितरणच्या सर्व वीजग्राहकांनी त्यांच्या वीज मीटरचे स्वतः रिडींग घेऊन महावितरणच्या वेबसाईट किंवा मोबाइल ऍपद्वारे अपलोड करावेत, असे आवाहन त्यांनी केले आहे. यामुळे वीजग्राहकांना अचूक मीटर रिडींगचे वीजबिल प्राप्त होईल.
डॉ. राऊत यांच्या सूचनेप्रमाणे महावितरणने मार्चचे बिल भरण्यास दि. 15 मे 2020 तर एप्रिल-2020चे वीजबिल भरण्यासाठी दि. 31 मे 2020 ची अंतिम तारीख दिली आहे. यामुळे लॉकडाऊन काळात अडचणीत असलेल्या राज्यातील महावितरणच्या वीजग्राहकांना दिलासा मिळाला आहे.