पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – राज्यातील सर्व धर्मीयांमधील ६० वर्षे व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना देशातील महत्त्वाच्या तीर्थक्षेत्राची मोफत यात्रा करण्यासाठी घोषित मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेच्या लाभासाठी इच्छुक ज्येष्ठ नागरिकांना अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ३१ ऑक्टोबरपर्यंत ऑफलाइनरीत्या, तर त्यानंतर ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरता येतील.
भारतातील एकूण ७३ व महाराष्ट्रातील ६६ तीर्थक्षेत्रांचा या योजनेमध्ये समावेश करण्यात आला आहे. जवळपास देशातील व राज्यातील सर्व महत्त्वाच्या तीर्थक्षेत्रांचा समावेश या योजनेत आहे.
निर्धारित तीर्थक्षेत्रांपैकी एका यात्रेसाठी पात्र व्यक्तीला या योजनेचा एक वेळ लाभ मिळणार आहे, तसेच प्रवास खर्चासाठी कमाल मर्यादा प्रतिव्यक्ती ३० हजार रुपये राहणार आहे. यामध्ये प्रत्यक्ष प्रवास, भोजन, निवास इत्यादी बाबींचा समावेश असेल.
मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना राबविण्यासाठी १४ जुलै रोजीच्या शासन निर्णयानुसार जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली ७ सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली असून,
जिल्हाधिकारी हे समितीचे उपाध्यक्ष, तर सहायक आयुक्त समाजकल्याण हे सदस्य सचिव असतील. यासंदर्भात जारी करण्यात आलेल्या शासन निर्णयात ८ ऑगस्ट रोजीच्या शासन निर्णयानुसार सुधारणा करण्यात आली आहे.
प्रत्येक जिल्ह्यासाठी लोकसंख्येच्या प्रमाणात स्वतंत्र कोटा निश्चित करण्यात येणार असून, ३१ ऑक्टोबरपर्यंत कमाल १ हजार पात्र लाभार्थ्यांचा कोटा निश्चित करण्यात येणार आहे. प्रवाशांची निवड जिल्हास्तरीय समितीद्वारे, तसेच कोट्यापेक्षा अधिक अर्ज आल्यास लॉटरीद्वारे करण्यात येणार आहे, अशी माहिती समाजकल्याणचे सहायक आयुक्त विशाल लोंढे यांनी दिली.