महाविद्यालय, अभ्यासक्रम बंदचे प्रस्ताव सादर करण्यासाठी 1 ऑगस्टपर्यंत मुदत

पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालये, परिसंस्था, अभ्यासक्रम बंद करण्यासाठी संबंधित महाविद्यालयांना प्रस्ताव दाखल करण्यासाठी 1 ऑगस्टपर्यंतची मुदत विद्यापीठाने दिली. शैक्षणिक वर्ष सन 2021-22 साठी विद्यापीठाच्या शैक्षणिक विभागाने विविध कारणांसाठीच्या मान्यतांचे प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना महाविद्यालयांना दिल्या आहेत.

विद्यार्थी संख्येत घट झाल्याने व आर्थिक कारणे, व्यवस्थापनातील अंतर्गत वाद-विवाद यामुळे महाविद्यालयाचा डोलारा चालविण्यात अडचणी येतात. त्यामुळे काही महाविद्यालये बंद पडण्याच्या मार्गावर असतात. महाविद्यालये सुरू करताना ज्या प्रमाणे विद्यापीठाची परवानगी घ्यावी लागते. त्याप्रमाणे बंद करतानाही घ्यावी लागते.

काही अभ्यासक्रम मोठ्या थाटामाटात सुरु करण्यात येतात. कालांतराने त्यातील विद्यार्थी संख्येत घट होत असते. नियमानुसार पुरेशी विद्यार्थी संख्या न मिळाल्यास अभ्यासक्रम बंदच करावे लागतात. विद्यार्थी संख्येअभावी काही महाविद्यायांना तुकड्या कमी करण्याची वेळ येते. महाविद्यालयांनी विद्यापीठाच्या वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज भरणे आवश्‍यक आहे. अर्जांची प्रिंट काढून ती संस्थेचे अध्यक्ष, सचिव यांच्यामार्फत कव्हरिंग लेटरहेडवर प्रस्ताव पाठविणे बंधनकारक आहे.

ऑनलाइन प्रस्तावासोबत संस्थेचा ठराव जोडून अखिल भारतील तंत्र शिक्षण यांच्या अखत्यारीतील अभ्यासक्रमांना अप्रुव्हल हॅंडबुक प्रमाणे विद्यार्थी संख्येचा उल्लेख करावा लागणार आहे. मुदतीनंतर आलेल्या प्रस्तावांचा विचार करण्यात येणार नाही, असेही विद्यापीठाकडून स्पष्ट करण्यात आले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.