पुणे – उच्च शिक्षण संचालनालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या राज्य शासनाच्या विविध विभागांतील शिष्यवृत्ती योजनांचे पुणे विभागातील शैक्षणिक संस्थांचे 2 हजार 393 ऑनलाइन अर्ज महाडीबीटी पोर्टलवर पडताळणीसाठी प्रलंबित आहेत. या अर्जांची पडताळणी करण्यासाठी आता 19 फेब्रुवारीपर्यंत पुन्हा मुदतवाढ दिली आहे.
माहिती तंत्रज्ञान विभागाच्या वतीने शिष्यवृत्तीच्या योजनांची ऑनलाइन अंमलबजावणी करण्यासाठी महाडीबीटी पोर्टल विकसित केले आहे. पुणे विभागातून 52 हजार 631 ऑनलाइन अर्ज दाखल झाले आहेत. यातील विविध शैक्षणिक संस्थांमधील 40 हजार 420 अर्ज पात्र ठरले आहेत. 4 हजार 211 अर्ज दुसऱ्या हप्त्यासाठी संस्थास्तरावर तसेच, 23 अर्ज विभागस्तरावर प्रलंबित आहेत. 2 हजार 370 अर्ज सिस्टिममध्ये नीट फॉरवर्ड झाले नाहीत.
प्रलंबित अर्ज निकाली काढण्यासाठी आता शेवटची संधी देण्यात आली आहे. यापुढे कोणत्याही परिस्थितीत मुदतवाढ देण्यात येणार नाही. विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीच्या दुसऱ्या हप्त्याचा लाभ देण्यासाठी संबंधित विद्यार्थ्यांच्या उपस्थितीबाबतची माहिती नमूद करून अर्ज पुढील टप्प्यांवर पाठवावेत. कोणत्याही महाविद्यालय, संस्था, विद्यापीठ यांनी त्यांच्या स्तरावर शिष्यवृत्ती अर्ज प्रलंबित ठेऊ नयेत.
एकही शिष्यवृत्तीपात्र विद्यार्थी वंचित राहिल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी महाविद्यालयाचे प्राचार्य, विद्यापीठांचे कुलसचिव यांच्यावरच राहणार आहे, असे पुणे विभागीय उच्च शिक्षण सहसंचालक डॉ. मोहन खताळ यांनी स्पष्ट केले आहे.
“मुदतपूर्व पडताळणीचे गांभीर्य लक्षात घ्यावे’
लिपिक व प्राचार्य स्तरावरून लॉगिनमध्ये अर्जांची मुदतपूर्व पडताळणी न केल्यामुळे प्रलंबित राहिलेले अर्ज सिस्टीमध्ये आपोआप नामंजूर होतात. त्यामुळे मुदतपूर्व पडताळणीचे गांभीर्य लक्षात घ्यावे. सद्यस्थितीत शिष्यवृत्ती योजनांचे लाभ वितरण सुरू करण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांनी त्यांचे प्रोफाईल लॉगिन करून त्यांच्या अर्जांची स्थिती तपासणे आवश्यक आहे. महत्त्वाच्या सूचना विद्यार्थ्यांच्या निदर्शनास आणून देण्याचीही आवश्यकता आहे.