अहमदनगर – कोपरगाव तालुक्यातील पढेगाव परिसरात एका नवविवाहितेचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. एकिकडे तरूणीने आत्महत्या केल्याचे सांगितेल जात असताना, तिच्या माहेरच्या मंडळींनी ही आत्महत्या नसून घातपात असल्याचे म्हटले आहे.
पुजा सागर मापारी (वय-24) या तरूणीचा मृतदेह गुरुवारी सकाळी विहिरीत आढळला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. पुजाचे सहा महिन्यापूर्वीच लग्न झाले होते. पण अचानक तिच्या मृत्यूमुळे संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे. पुजाने आत्महत्या केली असे बोलले जात होते. मात्र, माहेरच्या मंडळींनी तिच्या सासरच्यांविरूद्ध गंभीर आरोप केलेत.
तिच्या सासरच्या लोकांनी वारंवार पैशाची मागणी केली. त्यासाठी तिचा मानसिक आणि शारिरिक छळ करण्यात आला. त्यामुळे आमच्या मुलीने आत्महत्या केली नसुन तिचा घातपात केल्याचा आरोप सासरच्या मंडळींवर करण्यात आला आहे. तसेच या प्रकरणी आरोपींना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी त्यांनी केली आहे.
दरम्यान, सुसाईड नोट किंवा कोणतीही चिठ्ठी सापडलेली नाही. मृत्यू नेमका कसा झाला, आत्महत्या आहे की घातपात आहे याचा तपास कपोरगाव पोलीस करत आहेत.