Dead Body Found In Water – खडकी येथील अमर राजेंद्र कदम (वय २७) हा युवक मागील दोन दिवसांपासून बेपत्ता होता. याबाबत खडकी पोलीस स्टेशनमध्ये मिसिंगची तक्रार दाखल करण्यात आली होती. दरम्यान, आज सकाळी साईव खुर्द परिसरातील वरसगाव धरणाच्या बॅकवॉटर भागात त्यांचे ओळखपत्र, कपडे, मोबाईल आदी वस्तू आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली. घटनेची माहिती साईव खुर्द येथील पोलीस पाटील रुपाली पंडीत यांनी संबंधित यंत्रणांना दिली. त्यानंतर हवेली आपत्ती व्यवस्थापन रेस्क्यू टीमला पाचारण करण्यात आले. अध्यक्ष तानाजी भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली टीम घटनास्थळी दाखल झाली. प्राथमिक पाहणीत संबंधित ठिकाणी पाण्याचा खोल प्रवाह असल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार तातडीने शोधमोहीम राबविण्यात आली. काही वेळाच्या शोधानंतर पाण्यातून अमर कदम यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. त्यांनी आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. तसेच त्यांनी ‘Everyone Sorry’ असा स्टेटस मोबाईलवर ठेवला असल्याची माहितीही समोर आली आहे. या कारवाईत पोलीस कर्मचारी अनिकेत सोनवणे, निवास जगदाळे, मंगेश कदम यांच्यासह हवेली आपत्ती व्यवस्थापन टीमचे गणेश सपकाळ, संजय चोरघे, नारायण जावळकर, संतोष भगत आदींनी सहभाग घेतला. घटनेचा पुढील तपास खडकी पोलीस करत आहेत.