मुंबई: सध्या बँकेतील बचत खात्यांवरील व्याजदर निचांकी पातळीला पोहोचला आहे. त्यामुळे ग्राहक सातत्याने जास्त व्याजदर असणाऱ्या बँकांच्या शोधात असतात. अशा ग्राहकांसाठी एक सुवर्णसंधी चालून आली आहे.
डीसीबी बँकेने 75 व्या स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर एका विशेष मुदत ठेव योजनेची घोषणा केली होती. या मुदत ठेव योजनेत तीन वर्षांसाठी पैसे गुंतवल्यास 7.11 टक्के इतका व्याजदर मिळत आहे. या ऑफरचा आजचा शेवटचा दिवस आहे. तुम्हाला या योजनेत पैसे गुंतवायचे असतील तर DCB बँकेचे संकेतस्थळ किंवा मोबाईल अॅप्लिकेशनचा वापर करता येईल.
डीसीबी बँक ही देशातील प्रमुख खासगी बँकांपैकी एक आहे. देशभरात या बँकेच्या 354 शाखा आहेत. सध्याच्या घडीला बँकेत 10 लाखांच्या आसपास ग्राहक आहेत. रिटेल, मायक्रो फायनान्स, सूक्ष्म व लघू उद्योग, मिड कॉर्पोरेट मायक्रोफायनान्स इन्स्टिट्युशन, कृषी, कमोडिटी अशा विविध क्षेत्रांमध्ये बँकेने व्यावसायिक स्तरावर पाय रोवले आहेत.
डीसीबी बँकेने मे महिन्यात मुदत ठेवीवरील व्याजदरात बदल केला होता. बँकेत सात दिवसांपासून ते दहा वर्षांसाठीच्या कालावधीच्या मुदत ठेव योजना आहेत. यापैकी 7 ते 14 दिवसांच्या मुदत ठेवीवर 4.55 टक्के व्याज मिळते. 91 दिवस ते सहा महिन्यांसाठी 5.25 टक्के व्याज मिळते. तर 6 महिन्यांपासून ते 12 महिन्यांच्या कालावधीच्या मुदत ठेव योजनांसाठी 5.70 टक्के इतका व्याजदर आहे.