शाळा सुरू झाल्यानंतर ठरणार लाभार्थी
शालेय साहित्य, गणवेशाचे अनुदान थेट बॅंक खात्यात
लाभार्थींची संख्या निश्चित करण्यात अडचणी
पुणे – महापालिका शाळांमधील मुलांना यंदाही डीबीटीद्वारे शालेय साहित्य तसेच गणवेशाचे अनुदान थेट बॅंकेत जमा केले जाणार आहे. मात्र, यंदा हे अनुदान शाळा सुरू होण्यापूर्वी न देता ते जून महिन्याच्या अखेरीस दिले जाणार आहे. शाळा सुरू झाल्याशिवाय लाभार्थींची संख्या निश्चित करणे शक्य नसल्याने शाळा सुरू झाल्यानंतरच हा आकडा समजणार आहे. त्यामुळे त्यानंतरच हे पैसे दिले जाणार असल्याचे महापालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
महापालिकेच्या प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये सुमारे 1 लाख विद्यार्थी आहेत. या विद्यार्थ्यांना मागील वर्षापासून थेट बॅंक खात्यात शालेय साहित्य तसेच गणेशाचे अनुदान दिले जाते. त्यासाठी मागील वर्षी शिक्षण विभागाकडून सर्व मुलांची बॅंक खाती उघडण्यात आली होती. ही सर्व प्रक्रिया मागील वर्षी पूर्ण करण्यात आलेली आहे. त्यामुळे जवळपास सर्वच मुलांची बॅंकखाती तयार असून त्यावर केवळ अनुदानाची रक्कम जमा करायची आहे. मात्र, या सर्वच मुलांची इयत्ता बदलली असून काही वरच्या वर्गात गेली आहेत, तर काही शाळा सोडून दुसऱ्या शाळांमध्ये गेली आहेत. तर काही मुले आहे त्याच वर्गात आहेत. त्यामुळे शाळा सुरू झाल्यानंतरच पटसंख्येचा आकडा निश्चित होणार आहे. त्यामुळे प्रत्यक्षातील लाभार्थींची संख्या निश्चित होईपर्यंत महापालिकेस त्यांच्या खात्यात अनुदान जमा करणे शक्य नाही. ही बाब लक्षात घेऊन शिक्षण विभागाकडून सर्व मुख्याध्यापकांना याबाबत सूचना देण्यात आल्या असून 17 जूननंतर पुढील 15 दिवसांत शाळेतील विद्यार्थी पटसंख्या तसेच त्यांच्या खात्याची माहिती सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार, जून महिन्याच्या अखेरीस टप्प्या टप्प्याने ही रक्कम मुलांच्या खात्यात जमा केली जाणार आहे.