दया डोंगरे:अभिनयाचे फडकावले झेंडे

वयाच्या अवघ्या 12व्या वर्षी धारवाड आकाशवाणी केंद्रावरून दया डोंगरे यांनी त्या केंद्राच्या उद्‌घाटन प्रसंगी सादर केलेल्या सुगम संगीताला खूप वाहवा मिळाली होती आणि त्याचक्षणी “बाळाचे पाय पाळण्यात दिसतात’ या म्हणीनुसार दया पुढं मोठी कलाकार होणार हे जणू देवच बोलला होता. फरक एवढाच झाला की दयानं गायनाचा सांधा बदलला आणि ती अभिनयाच्या क्षेत्राकडे वळली.

“लेकुरे उदंड झाली’ या “गोवा हिंदू असोसिएशन’ या नाट्यसंस्थेच्या नाटकात श्रीकांत मोघे या कसलेल्या नटाबरोबर त्यांनी तेवढ्याच ताकदीनं त्यांना मिळालेल्या गाण्यांचं सोनं करून प्रेक्षकांची वाहवा मिळवली. अर्थात हेही खरं की, त्यांच्या वयाच्या केवळ 19व्या वर्षी आकाशवाणीचं आयोजित केलेल्या अखिल भारतीय सुगम संगीत स्पर्धेत त्यांनी पहिला क्रमांक पटकावला होता आणि खुद्द राष्ट्रपतींच्या हस्ते त्यांना ते पहिलं पारितोषिक बहाल करण्यात आलं होतं. म्हणजेच त्या उत्तम गायिकाही होऊ शकल्या असत्या हे त्यांनी आपल्या वयाच्या विशीतच सिद्ध करून दाखवलं होतं. त्यांची आत्या शांता मोडक. त्या काळामधली एक सुविद्य कलाकार म्हणून ओळखली जायची. त्या पदवीधर होत्या. त्यामुळे नाटकाच्या बोर्डावर त्यांचं नाव लिहून नावापुढं बी. ए. अशी पदवीही लिहिली जायची. आमच्या “प्रोग्रेसिव्ह ड्रमॅटिक असोसिएशन’ या संस्थेतले सारे कलावंत हे किमान पदवीधर होते. त्यांच्या नावापुढंही त्यांच्या पदव्या लिहिण्याचा प्रघात होता. त्या काळतला पदवीधर कलावंत हा अधिक उजवा मानला जायचा. तसं ते खरंही असायचं. कारण “ज्याला काही करता येत नाही त्याला नाटक कंपनीत घाला’ असं समाज तेव्हा मानायचा. त्यामुळे शिकलेल्या कलाकाराचं कौतुक असायचं.

कोणीही माणूस किंवा व्यक्‍ती कशी आहे हे ओळखायचं, तर तो कोणत्या कंपनीत वावरतो, कुणाची संगत ठेवतो यावर तो बरा-वाईट असल्याचं मानलं जातं. या तत्त्वानुसार विचार केला, तर दया डोंगरे या प्रा. वसंत कानेटकर, सतीश दुभाषी, दामू केंकरे, विजया मेहता, भक्‍ती बर्वे, प्रभाकर पणशीकर अशा एकाहून एक दिग्गज कलाकारांच्या सोबत वावरल्या. त्यांना काही प्रमाणात डोळ्यांचा विकार झाला आणि त्यांचा रंगमंच, चित्रपट, मालिका यांच्यामधला वावर बराच कमी झाला. आता त्या ऐंशीच्या घरात आहेत.

सचिन पिळगावकर आणि गजानन जागिरदार यांच्यासारख्या मोठ्या दिग्दर्शकांच्या चित्रपटांतही त्यांनी भूमिका केलेल्या आहेत. 1970 आणि 1980 दशकं गाजवणारी अशी ही नायिका-अभिनेत्री आहे. आपण बरं, आपलं काम बरं, आपला संसार बरा अशा वृत्ती-प्रवृत्तीमधून, म्हटलं तर सुखवस्तू, घरंदाज अशा अभिनेत्रीनं आपल्याला झेपणाऱ्या भूमिका केल्या. उगाचच वादग्रस्त विधानं करून किंवा मुलाखती देऊन प्रसिद्धी मिळवण्याची नसती उठाठेव कधी केली नाही. शरद डोंगरे या आपल्या नवऱ्यावर आणि आपल्या दोन्ही कन्यांवर प्रेम करून त्यांनी सुखाचा संसार केला, हे नक्‍की.

एकोणीसशे सत्तर आणि एकोणीसशे ऐंशी ही दोन्ही दशकं नाट्य-निर्मितीच्या दृष्टीनं “दुसरा बालगंधर्व’ काळ म्हणूनच मानावी लागतील. या वीस वर्षांत समस्या प्रधान गद्य नाटकं तर निर्माण झालीच पण त्याचबरोबर “घाशीराम कोतवाल’ आणि “सखाराम बाइंडर’ सारखी विवाद्य नाटकंही निर्माण झाली. त्याचबरोबर “नटसम्राट’, “हिमालयाची सावली’, “अखेरचा सवाल’, “कन्यादान’, “चारचौघी’, “सुवर्णतुला’, अशी अनेक लोकप्रिय नाटकं रंगमंचावर अवतरली. त्या काळात एकटं दूरदर्शन हे माध्यम होतं. इतर वाहिन्या अस्तित्वात नव्हत्या. त्यामुळे नाटकांचे दौरे व्हायचे.

महिन्यातले 20-20 दिवस दौरे चालायचे. नाटक व्यवसाय तेजीत होता. कलावंतांना बरे दिवस होते. चार पैसे मिळत होते. पुढं नव्वदचं दशक आलं. खासगी वाहिन्या सुरू झाल्या. केबल नावाचं एक नवं भूत अवतरलं. करमणुकीची साधनं वाढली. शहरात मर्यादित असलेली चित्रवाणी तिच्या वाहिन्यांसकट खेडोपाडी पोहोचली. कलावंतांना “मालिका’ या नव्या कलाविष्कारामुळे केवळ मुंबईत राहून चार पैसे मिळायला लागले. त्यांचं दौऱ्यावर जाणं तर कमी झालंच पण साराच खर्च वाढल्यानं दौरेही कमी झाले. नाट्यव्यवसायात एक प्रकारची मंदी आली. दया डोंगरे आणि तिच्या काळामधल्या कलाकारांना या मंदीची तशी झळ पोहोचली नाही. त्यात दया डोंगरे सारख्या कलावतीनं तर नाटक-चित्रपट-मालिकांमधून जणू संन्यासच घेतला.

दया डोंगरे यांचे पती शरद डोंगरे हे एक हरहुन्नरी गृहस्थ होते. एका खासगी कंपनीत ते उच्चपदस्थ अधिकारी होते. ते अचानक हे जग सोडून गेले. पण अचानक म्हणजे किती अचानक, तर त्यांच्या माहिमच्या घरात सकाळी डायनिंग टेबलवर चहा पीत बसले होते. पहिला चहा झाला आणि दुसरा चहा घेऊ यासाठी दया स्वयंपाकघरात गेली. चहा घेऊन परत येते तो शरदरावांनी मान टेकवलेली. काय म्हणायचं याला. किती अचानक येणारा हा हर्टऍटक. “मेड फॉर इच अदर’ सारखं हे कपल त्या मधला तो हंस त्याच्या सखीला मागं ठेवून निघून गेला. आता दया त्यांच्या सासरी असणाऱ्या आपल्या दोन कन्या, जावई आणि नातवंडं यांच्यात रमते आहे.

डॉ. विश्‍वास मेहेंदळे

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.