प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 1 – शिवाजी रस्ता आणि बाजीराव रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी पीएमपीने 10 मार्गांवरील मोठ्या बस पर्यायी रस्त्यांनी वळवल्या आहेत. यावर चौफेर टीका होत आहे. यावर “सोमवारी दिवसभर पाहणी केली,’ असा दावा पीएमपीच्या अधिकाऱ्यांनी केला आहे. यामध्ये “कोठेही गर्दी आढळली नाही. तसेच बस वेळेवर येत आहेत,’ असे दावे त्यांनी केले आहेत. याबाबत त्यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी “सगळं ओक्के आहे. तसेच याचा अहवाल पीएमपीच्या अध्यक्षांना देण्यात येणार आहे,’ असे सांगितले.
बाजीराव रस्त्यावरून धावणाऱ्या बस आता शिवाजीनगरकडे जाताना आता दांडेकर पूल, शास्त्री रस्ता, गोपाळकृष्ण गोखले रस्ता (फर्गसन कॉलेज रस्ता) मार्गे धावत आहेत. तर, स्वारगेटकडे येताना या बसेस जंगली महाराज रस्ता, डेक्कन, टिळक रस्ता मार्गे येतात. यामुळे बाजीराव रस्ता परिसरात जाणाऱ्यांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. बाजीराव रस्त्यावरून धावणारी पुण्यदशम स्वारगेटवरूनच भरून येत असल्यामुळे नागरिकांना बससाठी वाट पाहावी लागत आहे.
नागरिक म्हणतात, “खर्च वाढतोय..’
बाजीराव रस्त्यावर मानसिक त्रासाला नागरिकांना सामोरे जावे लागत असताना आता मार्ग बदलेल्या दहापैकी पाच बसमधून प्रवास करणाऱ्यांना आर्थिक नुकसान होत आहे. मार्केटयार्ड ते पिंपळे गुरव, कात्रज ते पिंपळे गुरव, स्वारगेट ते सांगवी, मार्केटयार्ड ते घोटावडे फाटा, कात्रज-गुजरवाडी ते चिंचवड गाव या बसचा मार्ग दांडेकर पूलमार्गे, शास्त्री रस्ता असा करण्यात आला आहे. त्यामुळे या मार्गावर प्रवास करणाऱ्यांना आता प्रत्येकी पाच रुपये जास्त भाडे भरावे लागत आहेत. या पाच मार्गांवर दिवसाला साधारण 30 बस धावतात. त्यांच्या दिवसाला 300 फेऱ्या होतात. या सर्व प्रवाशांना पाच रुपये जास्त द्यावे लागत आहेत. त्यामुळे नाराजी व्यक्त केली जात आहे. त्यामुळे पूर्वीप्रमाणे पुन्हा बाजीराव रस्तामार्गे बस सुरू करण्याची मागणी केली जात आहे.